अकोला

महिलांनी मतदानाचे कर्तव्य पार पाडावे

बुलडाणा – आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांनी पुढे येऊन आपल्या मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, तसेच लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन यांनी केले आहे.

लोकसभा निवडणूक २०१९ पेक्षा अधिक मतदान व्हावे आणि मतांचा टक्का वाढावा, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने सुनियोजित मतदार शिक्षण व निवडणूक सहभाग कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून प्रत्येक कुटुंबापर्यंत मतदानाचा संदेश पोहोचविण्यासाठी आणि मतदार जाणीव जागृतीच्या उद्देशाने जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विविध उपक्रमांच्या माध्यमातून मतदार जाणीव जागृतीविषयक अंमलबजावणी करण्यात येत आहे.

येत्या दि. २६ एप्रिल रोजी जिल्ह्यातील १ हजार ९६२ मतदान केंद्रावर बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्या अनुषंगाने मतदारांनी विशेषत: नवमतदार, महिला, दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचे कर्तव्य पार पाडावे, यासाठी व्यापक जाणीव-जागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण ९ लाख ८० हजार ८७० महिला मतदार आहेत. तर स्त्री-पुरूष मतदार गुणोत्तर हे ९१० आहे. सन २०१९च्या लोकसभा निवडणूकीत सरासरी ६३.५४ टक्के मतदारांनी आपले कर्तव्य पार पाडले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीत सुद्धा महिलांनी मोठ्या प्रमाणावर मताधिकार बजवावा, यासाठी मतदार जाणीव-जागृतीविषयक उपक्रमांच्या माध्यमातून लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. त्यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केद्रांवर मतदानकेंद्र जागृती समूह स्थापित करण्यात आले आहेत. तसेच सर्व शासकीय व निमशासकीय विभागांतर्गत मतदार जागृती मंचही स्थापित करण्यात आले आहेत.

दरम्यान याच उद्देशाने आज महिला व बाल विकास विभागातर्फे महिलांच्या मतदानाचा टक्का वाढविणे आणि महिला मतदारांना प्रेरीत करण्यासाठी अंगणवाडी ताईंच्या माध्यमातून सर्व तालुक्यात ‘गो वोट – चला जाऊया मतदानाला’चा जागर करण्यात आला आहे. जिल्हा मुख्यालयी जिल्हा परिषदेमध्ये आयोजित कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बी. एम. मोहन, महिला व बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद एंडोले, सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता विशाल पिंपळे, जिल्हा पशूसंवर्धन अधिकारी अशोक लोणे, पंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय इंगळे, बाल विकास प्रकल्प अधिकारी संदिप गवळी आदी उपस्थित होते.