राजकीय

सांगलीत मोठी घडामोड होण्याची शक्यता; विशाल पाटलांची बंडखोरी?

मुंबई : ठाकरे गट आणि काँग्रेस नेते विशाल पाटील यांच्यातील सांगलीचा वाद अजूनही थांबलेला नाही. सांगलीची जागा आपल्याला मिळावी म्हणून अजूनही विशाल पाटील आग्रही आहेत. विशाल पाटील यांचे बंधू प्रतिक पाटील यांनी या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. त्यामुळे सांगलीत मोठी घडामोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशाल पाटील बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांनाही उधाण आलं आहे. त्यातच आता प्रकाश आंबेडकर यांनी सांगलीच्या मुद्द्यावर उघड भाष्य केल्याने महाविकास आघाडीची सांगलीत चांगलीच कोंडी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

प्रकाश आंबेडकर उमरेड येथे सभेसाठी आले होते. यावेळी त्यांनी सांगलीच्या जागेवर भाष्य करून महाविकास आघाडीला टेन्शन दिलं आहे. काँग्रेसमध्ये लढण्याची ताकद नसल्यामुळे त्यांनी ठाकरे गटा समोर नांगी टाकली आहे. सांगलीत उबाठाची उभं राहण्याच ताकद नसून काँग्रेसची ताकद आहे. प्रतीक पाटील भेटून गेले. त्यांना आम्ही पाठिंबा देऊ आणि निवडून आणू अशी ग्वाही देतो, असं विधानच आंबेडकर यांनी केलं आहे. त्यामुळे विशाल पाटील बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना बळ मिळत आहे.

चार दिवसांपूर्वी प्रतीक पाटील आले आणि म्हणाले की, काय करायचं? म्हटलं हिंमत असेल, तर लढा. विशाल पाटील लढले तर आम्ही तुम्हाला पाठींबा देतो. आता त्यांच्यात हिंमत आहे की, नाही पाहायचे आहे. ते लढले, तर पाठिंबाही देऊ आणि निवडूनही आणू, असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेसच्या संविधान वाचवण्याच्या दाव्यातील हवाही प्रकाश आंबेडकर यांनी काढून टाकली आहे. काँग्रेस म्हणते, आम्हाला संविधान वाचवण्यासाठी मत द्या. मग वंचितला दोनच जागा का द्यायला निघाल्या होतात?, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी उपस्थित केला. मात्र जेव्हा मी आमचा लढा उभारू असं म्हटलं तेव्हा दोन घ्या, दहा घ्या म्हणत होते. खरं म्हणजे यांना दोन पेक्षा जास्त जागा द्यायच्या नव्हता. मॅच फिक्सिंग झालेली दिसते. त्यातून आपली इंक्वायरी बंद करायची असा तर डाव नव्हता ना? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.