अमरावती

मेळघाटच्या गावांमध्ये प्रचाराची भिस्त स्थानिकांवर

अमरावती – लोकसभा निवडणूक प्रचारात काट्याची टक्कर पहावयास मिळत आहे. यातच स्थानिक पातळीवरील प्रभावी नेते व कार्यकर्ते यांचे कमालीचे महत्त्व वाढले आहे. त्या दृष्टीने त्यांचे कामही सुरू झाले आहे. रिंगणात उभे असलेल्या उमेदवाराकडून लोकनेते व कार्यकर्त्यांची दररोज विचारपूस होत असल्याने त्यांचाही उत्साह शिगेला पोहोचला आहे.

याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते, समाजावर पकड असलेले सामाजिक व सांस्कृतिक कार्यात रुची असलेले व्यक्तिमत्व यांनाही मोठा मान दिला जात आहे. या माध्यमातून मतांची गोळाबेरीज कशी होईल, हेही तपासले जात आहे. शैक्षणिक, सामाजिक संस्था, क्रीडा, सांस्कृतिक मंडळ यांनाही खुश ठेवण्यासाठी विविध प्रयत्न केले जात आहेत. या सर्वांमध्ये हवशे, गवशे, नवसे यांना झेलून घेण्याची कसरत नेत्यांना करावी लागत आहे. शहरापेक्षा ग्रामीण भागात चर्चाचे फड रात्री उशिरापर्यंत गावातील चौकात रंगलेले पहावयास मिळतात.