महाराष्ट्र

नाशिक बाजार समितीच्या लिपीकाने केली 90 लाखाची फसवणूक

नाशिक – बनावट पावतीपुस्तके तयार करून त्याआधारे बाजार फीची रक्कम वसूल करून बाजार समितीच्या लिपिकाने सुमारे 90 लाख रुपयांचा अपहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी प्रकाश निवृत्ती घोलप (रा. गोकुळनंदन कॉलनी, प्रशांतनगर, पाथर्डी फाटा) हे नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव आहेत, तर आरोपी सुनील विश्वनाथ जाधव हा या समितीमध्ये लिपिक म्हणून काम करीत होता. आरोपी जाधव याने दि. 1 डिसेंबर 2021 ते 24 मे 2022 या कालावधीत नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये लिपिक या पदावर काम करीत असताना कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दप्तरामध्ये फेरफार करून बनावट पावतीपुस्तके तयार केली.

त्यानंतर आरोपी जाधव याने या पुस्तकांच्या आधारे बाजार समितीच्या गेटमधून प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांकडून फीची सुमारे 89 लाख 77 हजार 200 रुपयांची रक्कम वसूल केली; मात्र त्याने ही सर्व रक्कम बाजार समितीच्या बँक खात्यात जमा न करता या रकमेचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून या रकमेचा अपहार केला, तसेच आपल्या पदाचा गैरवापर करून जाधव याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीची फसवणूक व विश्वासघात केला. ही बाब लक्षात आल्यानंतर पंचवटी पोलीस ठाण्यात संशयित लिपिक सुनील जाधव याच्याविरुद्ध फसवणूक व अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पडोळकर करीत आहेत.