विदर्भ

नरेंद्र मोदी आणि विकास हे एकमेकांचे समानार्थी शब्द

गोंदिया – भाजप (एनडीए) सरकारच्या काळात देशात विकासाची नवी गाथा लिहिली जात आहे. त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विकास हे एकमेकांचे समानार्थी शब्द आहेत, असे प्रतिपादन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी केले. मोदींच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील महायुती सरकारने सर्व योजना प्रत्यक्षात लागू केल्या असल्याचेही ते म्हणाले.

गोंदिया येथे महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत त्यांनी गोंदियावासियांना संबोधित केले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भंडारा-गोंदियाचे लोकसभा उमेदवार सुनील मेंढे, गडचिरोली-चिमूर लोकसभा उमेदवार अशोक महादेवराव नेते व इतर नेते व्यासपीठावर उपस्थित होते. नड्डा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलग तिसऱ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले.

नड्डा म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणूक ही दोन विचारसरणींमधील निवडणूक आहे. एकीकडे इंडी आघाडी आहे, ज्यांच्याकडे भारताला पुढे नेण्याची कोणतीही दृष्टी नाही, त्यांचा उद्देश फक्त मोदीजींना हटवणे आणि अपशब्दाचा वापर करणे हेच आहे, तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपा देशाला विकासाचा मार्गावर पुढे नेण्याचा संकल्प आहे. यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय राजकारणाची व्याख्याच बदलून टाकली आहे. विरोधी पक्ष जात, समाज आणि धर्माच्या आधारे व्होट बँकेचे राजकारण करायचे, पण आता रिपोर्ट कार्ड पाहून जनता मते देत आहे.

पंतप्रधानांनी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयासचा संकल्प पूर्ण केला आहे. विरोधी पक्षांना जातीय जनगणनेच्या माध्यमातून देशाची जातींमध्ये विभागणी करायची आहे, पण पंतप्रधान मोदींचे मानणे आहे की, देशात गरीब, तरुण, अन्नदाता आणि महिला शक्ती अशा चारच जाती आहेत. जेव्हा गरीब, युवा, अन्नदाता, स्त्री शक्ती विकसित होईल, तेव्हा देश आपोआप प्रगती करेल. मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपा सरकारने गावे, गरीब, दलित, वंचित, शोषित, महिला, तरुण आणि शेतकरी यांना सक्षम केले आहे.

पूर्वीच्या सरकारांच्या कार्यकाळात 18 हजार गावांपर्यंत वीज पोहोचली नव्हती, परंतु मोदींच्या नेतृत्वाखाली सौभाग्य योजनेंतर्गत अडीच कोटी लोकांच्या घरात वीज पोहोचवण्यात आली आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत 80 कोटी लोकांना 5 किलो अन्नधान्य मोफत उपलब्ध करण्यात आले आहे आणि त्याचा परिणाम म्हणून भारतातील 25 कोटी लोक दारिद्र्यरेषेच्या वर आले आहेत आणि देशातील अत्यंत दारिद्र्य फक्त 1 टक्क्यांखाली आहे.

अहंकारी आघाडीवर हल्लाबोल करताना नड्डा म्हणाले की, एकीकडे पंतप्रधान मोदी म्हणतात भ्रष्टाचार हटवा, तर दुसरीकडे इंडी आघाडी म्हणते भ्रष्टाचाऱ्यांना वाचवा. काँग्रेसने आपल्या कार्यकाळात बोफोर्स, ऑगस्टा वेस्टलँड, पाणबुडी, तांदूळ घोटाळा, साखर, कोळसा, हेलिकॉप्टर, 2G आणि 3G असे अनेक घोटाळे केले. अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, के. कविता, अरविंद केजरीवाल आणि एम.के. स्टॅलिन यांच्यासह इंडी आघाडीच्या सर्व नेत्यांवर भ्रष्टाचाराचे अनेक गुन्हे दाखल आहेत. अहंकारी आघाडीचे नेते एक तर जामिनावर किंवा तुरुंगात आहेत.