अमरावती

स्टार प्रचारकांच्या सभा ठरवितांना साधला जातोय पॉवर गेम

अमरावती – कोणत्या स्टार प्रचारकाची सभा विजयाचे समीकरण बिघडवू शकते, याची महायुती आणि महाविकास आघाडीकडून चाचपणी केली जात आहे. त्यानंतर काही स्टार प्रचारकांच्या सभांचे नियोजित ठिकाण बदलले जात आहे. त्यामुळे स्टार प्रचारकांच्या सभा ठरवताना पॉवर गेम साधला जात असल्याचे चित्र आहे.

अमरावती लोकसभा मतदार संघात 26 एप्रिल ला मतदान होत आहे. विख्यात तिरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जाहीर प्रचारासाठी आता मोजका तेरा दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून स्टार प्रचारकांच्या मोठ्या सभा घेऊन अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.शेवटच्या दिवसात आपल्या बाजूने मतांचे परिवर्तन कसे करता येईल, यादृष्टीने सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांकडून प्रयत्न केले जात आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांच्या निवडणूक प्रचारार्थ काँग्रेस चे मोठे नेते पुढील दिवसात जाहीर सभांसाठी अमरावती जिल्ह्यात येण्याची शक्यता आहे.

तर महायुती च्या उमेदवार नवनीत राणा यांच्या प्रचारार्थ अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र भाई मोदी यांच्या सभांचे नियोजन करण्यात येत आहे.तर प्रहार पक्षाचे उमेदवार दिनेश बुब यांच्या प्रचारार्थ आ. बच्चू कडू, आ. राजकुमार पटेल प्रचार सभा घेत आहेत. एकंदरीत कोणत्या स्टार प्रचारकामुळे मतदारसंघातील वातावरण अनुकूल होण्यास मदत होऊ शकते, याचा कानोसा घेऊन सभांचे नियोजन केले जात असल्याचे चित्र सध्या अमरावती लोकसभा क्षेत्रात पहावयास मिळत आहे.