पश्चिम महाराष्ट्र

औरंगजेबाला मानतात अशा लोकांशी उद्धव ठाकरेंनी हातमिळवणी

कोल्हापूर – काँग्रेसचा अजेंडा हा आहे की त्यांचं सरकार आलं तर ते काश्मीरमध्ये कलम ३७० परत लागू करतील. सीएए रद्द करतील असं सांगत आहेत. काँग्रेस आणि इंडि आघाडीकडून हे लांगुलचालन केलं जातं आहे, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोल्हापूरच्या सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. ज्या लोकांची लोकसभा निवडणूक तीन अंकी संख्या गाठेपर्यंत दमछाक होणार आहे असे लोक सरकार आणू शकतात का? असा प्रश्नही मोदींनी विचारला.

अयोध्येत राम मंदिर बांधलं गेलं आहे. ५०० वर्षांपासूनचं स्वप्न पूर्ण झालं. अनेक दशकं काँग्रेसने मंदिर बांधू दिलं नाही. मात्र मंदिर बांधल्यानंतर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही काँग्रेसचे लोक आले नाहीत. काँग्रेसचं अधःपतन झालं आहे तरीही राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रणही त्यांनी नाकारलं अशा लोकांवर तुम्ही विश्वास ठेवू शकता का? काँग्रेसच्या लोकांनी आरशात चेहरा पाहिला पाहिजे. अयोध्या प्रकरणात अन्सारी कुटुंब लढा देत होतं. मात्र न्यायालयाने त्या ठिकाणी मंदिर होतं हा निर्णय दिला होता तेव्हा अन्सारी कुटुंबातले सदस्यही प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला आले होते. आयुष्यभर लढले पण शेवटी रामाच्या चरणी आले. मात्र काँग्रेसवाल्यांनी राम मंदिराच्या सोहळ्यावर बहिष्कार घातला. त्यांचं काय करायचं ते तुम्हीच बघा असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.