महाराष्ट्र

मोदींच्या इंजिनला विकासाचे डबे

सांगली : मोदींच्या इंजिनला विकासाचे डबे आहेत, तर विरोधकांच्या इंजिनला डबेच नाहीत. यामुळे सबका साथ सबका विकास हे मोदींजींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपलाच साथ द्यावी असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी कडेगाव येथे झालेल्या प्रचार सभेत केले. भाजपचे उमेदवार खा. संजयकाका पाटील यांच्या प्रचारार्थ आज कडेगावच्या देशमुख चौकामध्ये उपमुख्यमंत्री फडणवीस यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी खा. पाटील यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे, आ. सुधीर गाडगीळ, गोपीचंद पडळकर, मकरंद देशपांडे, नीता केळकर, अमरसिंह देशमुख आदी उपस्थित होते..

प्रारंभी स्वागत व प्रास्ताविक करत असताना जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी विकास निधी देण्यात दुजाभाव का केला असा खडा सवाल खासदारांना उपस्थित केला. मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी यावेळीही भाजपलाच मदत करणार असेही ते म्हणाले. जर माजी आमदार पृथ्वीराज देशमुख म्हणाले, निवडून आल्यानंतर आम्हाला मदत केली नाही तरी चालेल, मात्र, दुजाभाव नको असे सांगत असताना पक्ष एकसंध राहिला पाहिजे या भूमिकेतून अध्यक्षपदाचा उपयोग सात वर्षे केला. मात्र, आमच्या पक्षातून दुसर्‍या पक्षाला मदत करण्याचे धोरण थांबवले पाहिजे असे मत व्यक्त केले.

यावेळी उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, जे झाले ते झाले. यापुढील काळात मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार आहे. पंतप्रधान मोदी यांना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांचेच योगदान लागणार आहे. विरोधकांकडे केवळ इंजिन असून त्यामध्ये अन्य कोणाला बसण्यासाठी जागा नाही. मात्र, मोदी इंजिन असलेल्या रेल्वेला अनेक डबे जोडले असून यामध्ये सर्वांनाच विकासाची संधी आहे. पंतप्रधान मोदी यांनी दिलेल्या लसीमुळे आमच्या लोकांचे प्राण वाचले असे मत जगातील शंभर देश सोंगत असून यामुळे मोदी हे विश्‍वगुरू असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशाची अर्थव्यवस्था भक्कम होत असल्याचे चित्र दिसत आहे.