महाराष्ट्र

आईच्या पदराला धरुन राजकारण; राहुल गांधींना टोला

कोल्हापूर – कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. यावेळी या सभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “आईच्या मृत्यूचे दुःख विसरुन स्वतःला देशसेवेसाठी वाहून घेणारे पतंप्रधान आपल्याला पाहिजे. मात्र, आजही आईच्या पदराला धरुन राजकारण करणारा पंतप्रधान आपल्याला नको”, असे म्हणत मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता राहुल गांधींवर खोचक टीका केली.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, आता नकली शिवसेना राहिली आहे. तर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ आली तर मी माझे दुकान बंद करेन. मात्र, आज त्यांचा मुलगा आणि परिवार पंजाला (काँग्रेसला) मतदान करणार आहे. हे या राज्याचं दुर्देव आहे. जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. ज्या गोष्टींचा खेद वाटायला हवा, त्या गोष्टींचा त्यांना अभिमान वाटत आहे. त्यांना आता हिंदू म्हणून घेण्याचीही लाज वाटायला लागली आहे. हिंदुहृदयसम्राट म्हणण्यासाठीही त्यांची जीभ कचरु लागली असून आता उबाठाची शंभर टक्के काँग्रेस झाली आहे”, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

“देशाचे कणखर आणि कर्तृत्वत्वान पंतप्रधान आपल्याला निवडायचे आहेत. आपल्या देशात गर्मी वाढल्यानंतर परदेशात जाणारा नेता आपल्याला नको आहे. २४ तास काम करणारे आणि १० वर्षात एकही सुट्टी न घेणारे पंतप्रधान आपल्याला पाहिजे आहेत. आईच्या मृत्यूचे दुःख विसरुन स्वतःला देशाच्या सेवेसाठी वाहून घेणारे पतंप्रधान आपल्याला पाहिजे आहेत. पण आजही आईच्या पदराला धरुन राजकारण करणारा पंतप्रधान आपल्याला नको”, अशी खोचक टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी नाव न घेता राहुल गांधी यांच्यावर केली.