महाराष्ट्र

“बाळासाहेबांच्या मुलाने काँग्रेसला मतदान करावे हे दुर्दैवी”

कोल्हापूर – लोकसभा निवडणुकीचे दोन टप्पे पार पडले आहेत आता तिसरा टप्पा ७ मे रोजी पार पडणार आहे. त्यासाठीचा प्रचार सुरु आहे. कोल्हापूर येथील प्रचारसभेत बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे. बाळासाहेबांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार ही बाब दुर्दैवी आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री वर्षा गायकवाड यांना जेव्हा महाविकास आघाडीने तिकिट दिलं तेव्हा उद्धव ठाकरेंनी त्यांचं अभिनंदन केलं. “वर्षाताई माझं मत तुलाच” असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. यावरुनच एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंवर टीका केली.

“मुंबईत २६ जुलैचा पूर आला तेव्हा बाळासाहेबांना मातोश्रीवर ठेवून उद्धव ठाकरे कुटुंबासह फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये राहण्यासाठी गेले होते.” हा प्रसंग त्यांनी त्यांच्या भाषणात सांगितला. तसंच बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख करत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली. “बाळासाहेब म्हणाले होते शिवसेनेची कधीही काँग्रेस होऊ देणार नाही. अशी वेळ माझ्यावर आली तर दुकान बंद करेन. आज त्यांचा मुलगा काँग्रेसला मतदान करणार आहे. या देशाचं आणि राज्याचं हे दुर्दैव आहे. जनाची नाही तर मनाची तरी ठेवली पाहिजे. हे पाऊल उचलल्याने बाळासाहेबांच्या मनाला किती वेदना होत असतील. ज्या गोष्टींचा खेद वाटला पाहिजे त्या अभिमानाने सांगत आहेत.” असं एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंना उद्देशून म्हणाले.