मुंबई

मुंबई विद्यापीठ वसतीगृहात दूषित पाणी! विद्यार्थिनींना बाधा

मुंबई : मुंबई विद्यापीठामधील कलिना कॅम्पस येथील नूतन मुलींच्या वसतिगृहात दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे वसतिगृहात राहणार्या ४० हून अधिक विद्यार्थिनींना उलटी, डोकेदुखी, पोटदुखीचा त्रास झाला. विद्यार्थिनींना ही बाधा मुंबई महापालिकेकडून होणार्या दुषित पाण्यामुळे झाली की वसतिगृहात लावण्यात आलेल्या वॅाटर कुलरमुळे झाली, याची चौकशी करण्याची मागणी ठाकरे गटाच्या युवासेनेने केली. याबाबतचे पत्र युवासेनेकडून कुलगुरु प्रा.(डॉ.) रविंद्र कुळकर्णी यांना पाठवले.

युवासेना माजी सिनेट सदस्यांनी वसतिगृहात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली असता इथे अनेक त्रुटी आढळल्या. या त्रुटीची माहिती त्यांनी कुलगुरुंना दिली. त्यानुसार येथील पाण्याची तपासणी करण्यात आली. त्याचा अहवाल सोमवारी दिला जाणार आहे. येथील पाचपैकी फक्त तीनच कुलर वापरात आहेत. उर्वरित दोन अजून कार्यन्वित नाहीत, तर ते दोन्ही कुलर तातडीने वापरासाठी घेण्याच्या सूचना कुलगुरुंनी अभियंता विभागास दिल्या. विद्यार्थ्यांना तातडीने औषधोपचार मिळावा, यासाठी किमान एक डॉक्टर आरोग्य केंद्रात उपलब्ध असावा अशी व्यवस्था करण्यात यावी, असा आदेश कुलगुरुंनी दिला.