राजकीय

पवारांच्या उमेदवाराला लीडसाठी फडणवीसांच्या आमदारांमध्ये पैज

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात भाजप आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांना उमेदवारी दिली आहे. दरम्यान, अर्चना पाटील यांना कोण जास्त लीड मिळवून देणार? यावरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या दोन विश्वासू आमदारांमध्ये शर्यत लागली आहे. अजित पवार यांच्या उपस्थितीत अर्चना पाटील यांनी शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी याबाबतचा खुलासा केला आहे.
राजा राऊत आणि माझी शर्यत लागलेली आहे. अर्चना पाटील यांना सर्वांत जास्त लीड कोण देणार? औसेकर देणार की, बार्शीकर देणार ? असा सवाल सभेला उपस्थित नागरिकांना करत अभिमन्यू पवार यांनी पैजेबाबत भाष्य केलं आहे. शिवाय औसामधूनच अर्चना पाटील यांना सर्वाधिक लीड मिळेल, असा दावा अभिमन्यू पवार यांनी केला आहे.

पुढे बोलताना पवार म्हणाले, आजच्या सभेची गर्दी पाहून विरोधकांना धडकी भरली असेल. आज धडाकेबाज पद्धतीने फॉर्म भरलेला आहे. समोरच्या उमेदवाराचे डिपॉजिट जप्त होण्याचेच फक्त बाकी आहे. आपण नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा पंतप्रधान करण्यासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत, असंही अभिमन्यू पवार यांनी स्पष्ट केलं. यावेळी पवार यांनी अबकी बार 400 पारच्या घोषणाही दिल्या.

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी 399 जागांचा फैसला केलेला आहे. 400 वा आकडा आपला असणार आहे. जागा निवडून आणणार की नाही? 400 वा आकडा आपला होणार की नाही? माझी आणि राजाभाऊ यांची शर्यत लागली आहे. औसेकर देणार की बार्शीकर देणार, असंही अभिमन्यू पवार यांनी सांगितले. त्यामुळे औसाचे आमदार अभिमन्यू पवार आणि राजेंद्र राऊत यांनी ठाकरेंचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. दोघांनीही अर्चना पाटील यांना सर्वांत जास्त लीड देण्याचा चंग बांधलाय. धाराशिव लोकसभेत पारंपारिक प्रतिस्पर्धी असेलेले पाटील -निंबाळकर घराणे आमने सामने आले आहे. त्यामुळे धाराशिवच्या लढतीकडे सर्वांचे लक्ष आहे.