महाराष्ट्र

उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाशी फारकत घेतली

मुंबई : शिवसेना ठाकरे गटाच्या मशाल गीतातून जय भवानी हा शब्द काढण्यासाठी निवडणूक आयोगाने ठाकरे गटाला नोटीस पाठवली. यानंतर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली.

आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमच्या गीतातील जय भवानी शब्द काढणार नाही. जय भवानी, जय शिवाजी ही आमची घोषणा आहे. आज तुम्ही आमच्या घोषणेतील जय भवानी शब्द तुम्ही काढायला लावत आहात, उद्या तुम्ही जय शिवाजी शब्द काढायला लावाल, ही हुकूमशाहीची पद्धत आम्ही स्वीकारणार नाही, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले होते. यावरून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे मानसिक संतुलन ढासळले आहे. त्यामुळे ते कुठलेही बेताल वक्तव्य करतात. त्यांनी हिंदुत्वाशी फारकत घेतली आहे. निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्याच आहे. शेवटी हे कायद्याचे राज्य आहे. कायद्याच्या राज्यामध्ये दिलेले निर्देश हे पाळलेच पाहिजे, असा टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

नेवासा तालुक्यातील वडाळा येथील एमजेएफ रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया केलेल्या महिला रुग्णांबाबत घडलेला प्रकार अतिशय गंभीर असून हॉस्पिटलची क्षमता नसताना एवढ्या महिला तिथे गेल्या कशा? हा खरा प्रश्न आहे. याबाबत जिल्हाधिकारी यांनी चौकशी करायला हवी. सुदैवाने तिथे कोणतेही जीवितहानी झाली नाही पण हा प्रकार गंभीर असल्याची प्रतिक्रिया अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी दिली आहे.