ताज्या बातम्या राजकीय

तृणमूलच्या महुआ मोईत्रा लोकसभेतून बडतर्फ

‘कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात गेली खासदारकी

नवी दिल्ली, 08 डिसेंबर  : ‘कॅश फॉर क्वेरी’ अर्थात पैसे घेऊन संसदेत प्रश्न उपस्थित केल्या प्रकरणी तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांची गच्छंती करण्यात आलीय. याप्रकरणी नेमलेल्या लोकसभेच्या नैतिक समितीने केलेल्या शिफारसीनुसार आज, शुक्रवारी मतदानाने महुआ मोईत्रांना बडतर्फ करण्यात आले.

कॅश फॉर क्वेरी’ प्रकरणात सहभागी असलेल्या टीएमसी खासदार महुआ मोईत्रा यांचे संसद सदस्यत्व संपले आहे. नैतिक समितीच्या अहवालानंतर त्यांच्या गच्छंतीचा प्रस्ताव मांडण्यात आला. यानंतर मतदान झाले. मात्र, महुआ मोईत्रा यांची हकालपट्टी करण्यासाठी सभागृहात मतदान सुरू होताच विरोधकांनी बहिष्कार टाकला. मतदानानंतर लोकसभा अध्यक्षांनी महुआ मोइत्रा यांच्या गच्छंतीचा प्रस्ताव मंजूर केला. महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत प्रश्न विचारण्यासाठी व्यावसायिक हिरानंदानी यांच्याकडून रोख रक्कम आणि महागड्या भेटवस्तू घेतल्या होत्या, असा आरोप होता. तसेच मोईत्रा यांनी हिरानंदानी यांना संसदेकडून दिले जाणारा लॉग-इन आयडी व पासवर्ड दिला होता. त्यावरून हिरानंदानी यांनी अदानी समूहासंदर्भात प्रश्न विचारले होते. त्याबदल्यात मोईत्रा यांनी लाच घेतल्याचा आरोप खा. निशीकांत दुबेंनी लोकसभाध्यक्षांना पत्र लिहून केला होता.

या पत्राच्या आधारे लोकसभाध्यक्षांनी हे प्रकरण नैतिकता समितीकडे सोपविले होते. लोकसभेत मांडण्यात आलेल्या नैतिक समितीच्या अहवालात महुआंचे संसद सदस्यत्व रद्द करण्याची शिफारस करून कायदेशीर चौकशीची मागणी केली होती. मात्र, टीएमसीने 500 पानांचा अहवाल वाचण्यासाठी 48 तासांचा अवधी देण्याची मागणी केली होती. आज, शुक्रवारी सकाळी 11 वाजता लोकसभेचे कामकाज सुरू झाले, मात्र दुपारी 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर 12 वाजता नैतिक समितीचे अध्यक्ष विजय सोनकर यांनी अहवाल सादर केला. या मुद्द्यावरून लोकसभेत तीनदा गदारोळ झाला. दोन वेळा कामकाज तहकूब करण्यात आले. महुआंच्या हकालपट्टीसाठी दुपारी 2 वाजता तिसऱ्यांदा मतदान झाले.