क्राईम ताज्या बातम्या

भरदिवसा गोळीबाराचा थरार.. एकचा मृत्यू ,२ जखमी

बुलढाणा : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बुलढाण्यातील रोहणा गावात वैध शस्त्र खरेदी विक्रीच्या व्यवहारातून दोन गटात जोरदार राडा झाला.यावेळी झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झालेत.

या भयंकर घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्हा हादरुन गेला आहे. गोळीबारातील जखमींवर सध्या खामगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील रोहणा गावात आज (गुरूवार, ७ डिसेंबर) पारधी समाजातील दोन गटात तुफान राडा झाला. अवैध शस्त्र खरेदी विक्रीच्या व्यवहारातून हा वाद झाला. या वादात तिघांनी गोळीबार केला.

या गोळीबारामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. ज्यामधील एकाचा मृत्यू झाला.घटनेत एक महिलाही जखमी झाली असून त्यांच्यावर सध्या खामगावच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ गावात धाव घेतली. सध्या गावात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे. भरदिवसा घडलेल्या या भयंकर घटनेने संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.