मनोरंजन

११ डिसेंबर ते १६ डिसेंबर दरम्यान रंगणार ”कोकण चित्रपट महोत्सव”

मुंबई, ८ डिसेंबर : कला, संस्कृती आणि परंपरेचे माहेरघर म्हणजे कोकण. कलेची आणि कलाकारांची खाण म्हणजे कोकण. असंख्य कलाकार ह्या मातीत घडले आणि घडत आहेत. कोकणातल्या कलाकारांनी एकत्र येत कोकणाचा सांस्कृतिक वारसा जपला जावा तसेच चित्रपटाच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळावी या उद्देश्याने ”सिंधुरत्न कलावंत मंच’ स्थापन करत ”कोकण चित्रपट महोत्सवा”ची सुरुवात केली. पहिल्या कोकण चित्रपट महोत्सवाच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या महोत्सवासाठी सिंधुरत्न कलावंत मंच सज्ज झाला आहे. यंदा या कोकण चित्रपट महोत्सवाचे दुसरे वर्ष असून सोमवार ११ डिसेंबर ते शनिवार १६ डिसेंबर दरम्यान हा महोत्सव रंगणार आहे.

११ डिसेंबरला रत्नागिरीमध्ये या महोस्तवाचा उदघाट्न सोहळा संपन्न होणार असून त्यानंतर चित्रपटांचे प्रदर्शन आयोजण्यात आले आहे. पुढील तीन दिवस १२, १३ व १४ डिसेंबरला मराठी चित्रपट दाखवण्यात येणार असून १५ डिसेंबरला सिंधुदुर्गात सेमिनारचे आयोजन करण्यात आले आहे. या सेमिनारमध्ये कोकणातील मान्यवर कलाकार, वक्ते म्हणून सहभागी होणार आहेत. १६ डिसेंबरला बक्षिस समारंभ आणि महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न होईल.

सिंधूरत्न कलावंत मंच या संस्थेचा मूळ उद्देश म्हणजे कोकणातील कला आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावा हा आहे. गेल्या वर्षी या महोत्सवाची मुहूर्तमेढ रोवली गेली. याही वर्षी ११ डिसेंबरपासून रत्नागिरी मधून या महोत्सवाची सुरुवात होत आहे. १६ डिसेंबरला मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृहात हा भव्यदिव्य महोत्सव रंगणार आहे. कोकणात निसर्गसंपन्नतेसह उत्तोमोत्तम कलाकार-तंत्रज्ञ आहेत त्यांचे कलागुण जगासमोर यावे आणि त्यांची कीर्ती सर्वदूर पसरावी हाच संस्थेचा निर्मळ हेतू आहे. यासाठी वर्षा उसगांवकर, सिद्धार्थ जाधव, प्रथमेश परब, प्रभाकर मोरे यांसारखे दिग्ग्ज कलाकार या सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहत स्थानिक कलाकारांचे मनोबल वाढवतील. शिवाय संतोष पवार, पॅडी कांबळे, पूजा सावंत, संदीप पाठक, अभिजीत चव्हाण, दिगंबर नाईक, सुहास परांजपे, मेधा गाडगे, आरती सोळंकी, हेमलता बाणे आदी कलाकारांचे दमदार परफॉर्मन्स या महोत्सवाला चारचाँद लावतील यात काही शंका नाही.

विशेष म्हणजे सिंधूरत्न कलावंत मंच संस्थेला महानायक श्री अमिताभ बच्चन यांनी पत्ररुपी तर अभिषेक बच्चन यांनी शब्दरूपी शुभेच्छा दिल्या आहेत. हा चित्रपट महोत्सव रत्नागिरी, मालवण, कणकवली आणि वैभववाडी या चार तालुक्यांमध्ये होणार असून येथे आठ चित्रपट विनामूल्य दाखवण्यात येतील. या चित्रपट महोत्सवात कोकणात चित्रित करण्यात आलेले लघु चित्रपट तसेच व्हिडिओ सॉंग अल्बम यांना पारितोषिक देण्यात येतील जेणेकरून तेथील चित्रपट संस्कृती वाढावी ही एकमेव भावना असल्याचे अध्यक्ष विजय पाटकर यांनी सांगितले. कोकणातल्या मातीत अनेक हरहुन्नरी कलाकार आहेत. ”सिंधुरत्न कलावंत मंच’ अशा कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी कटीबद्ध असून गेल्यावर्षीप्रमाणेच या ही वर्षी महोत्सवाला उत्तम प्रतिसाद मिळेल, असा विश्वास संस्थेला आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदी विजय पाटकर, उपाध्यक्ष अलका कुबल, सचिव विजय राणे, कार्यवाह प्रकाश जाधव, प्रमोद मोहिते, यश सुर्वे आदी मंडळी आहेत.