महाराष्ट्र

दोन माजी मुख्यमंत्र्यांसह आठ केंद्रीय मंत्री, माजी राज्यपालांचं भवितव्य पणाला

मुंबई – निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात देशातील १९ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण १०२ लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदान चालू आहे. छत्तीसगडमधल्या बस्तरसारख्या नक्षली भागासह काही संवेदनशील मतदारसंघांमध्येदेखील आज मतदान होत असल्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात १६.६३ कोटी मतदार १.८७ लाख मतदान केंद्रांवर जाऊन त्यांचा मतदानाचा हक्क बजावतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत, केंद्रीय मत्री नितीन गडकरी, दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतला सुपरस्टार रजनीकांत, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वेळापूर्वी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला.

निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात एकूण १,६२५ उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. यामध्ये १३४ महिला आणि १,४९१ पुरूष उमेदवार आहेत. पहिल्या टप्प्यात आठ केंद्रीय मंत्री, दोन माजी मुख्यमंत्री, एक माजी राज्यपाल निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. पहिल्या टप्प्यात ज्या मतदारसंघांमध्ये मतदान होत आहे त्या १०२ जागांपैकी ४५ जागा एनडीएने आणि ४१ यूपीए आणि इतर पक्षांनी जिंकल्या होत्या.

पहिल्या टप्प्यात, उत्तर प्रदेश, मध्‍य प्रदेश, राजस्थान, तमिळनाडू, आसाम, बिहार, उत्तराखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, मणिपूर, छत्तीसगड, जम्मू-कश्मीर, अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, मिझोरम, लक्षद्वीप, पाँडेचेरी, सिक्किम, नगालँडमध्ये मतदान होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवरही आज मतदान होत आहे. नागपूर, रामटेकसह विदर्भातील पाच मतदारसंघांमध्ये आज मतदान होत आहे.