ताज्या बातम्या

ज्येष्ठ नेते विवेक कांबळे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीची मोठी हानी – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि.15 – रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष आणि सांगलीचे माजी महापौर विवेक कांबळे यांच्या निधनामुळे आंबेडकरी चळवळीची मोठी हानी झाली आहे. दलित पँथरपासुन आंबेडकरी चळवळीत भरीव योगदान देणारे लढाऊ, अभ्यासू ज्येष्ठ नेते विवेक कांबळे यांच्या निधनामुळे आपल्याला धक्का बसल्याचे सांगत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी दिवंगत विवेक कांबळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली आहे.

दिवंगत विवेक कांबळे हे सांगली जिल्हयातील रिपब्लिकन पक्षाचे ज्येष्ठ नेते होते. त्यांनी भारतीय दलित पँथरपासून मला निष्ठावंतपणे साथ देत आंबेडकरी चळवळीत भरीव योगदान दिले. भारतीय दलित पँथरपासून रिपब्लिकन पक्षापर्यंत त्यांनी एकनिष्ठपणे माझे नेतृत्व स्विकारुन काम केले.रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते; सांगली जिल्हयातील ज्येष्ठ नेते; आक्रमक वक्ता, अभ्यासू नेता म्हणून विवेक कांबळे यांनी आपल्या कामाचा सांगली आणि पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळावर अमीट ठसा उमटवला होता.

त्यांनी सांगली कुपवाड महानगरपालिकेचे महापौर म्हणूनही चांगले काम केले. नव्या पिढीला मार्गदर्शक म्हणूनही काम करीत होते. पश्चिम महाराष्ट्रात आणि संबंध महाराष्ट्रामध्ये कर्नाटकातील बेळगाव, निपाणी या भागातही दिवंगत विवेक कांबळे यांचे काम होते. त्यांनी रिपब्लिकन पक्ष हा सर्वदुर पोहचवला. महामानव डाँ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर प्रचंड निष्ठा आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वावर प्रचंड विश्वास ठेवून विवेक कांबळे यांनी आपले काम केले.

ज्येष्ठ नेते विवेक कांबळे यांनी रिपब्लिकन चळवळ खेडयापाडयात पोहचविण्यात सिंहाचा वाटा उचलला असे सांगत ना.रामदास आठवले यांनी दिवंगत विवेक कांबळे यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहिली. विवेक कांबळे यांच्या निधनाने रिपब्लिकन चळवळीचा पँथर हरपला असल्याची शोकभावना ना.रामदास आठवले यांनी व्यक्त केली.