महाराष्ट्र

राणेंच्या प्रचारासाठी योगी आदित्यनाथ येणार

रत्नागिरी – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ येत्या १ मे रोजी रत्नागिरीत येणार असल्याची माहिती भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून देण्यात आली.

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे केंद्रात मंत्री असलेले नारायण राणे यांना महायुतीचे उमेदवार म्हणून रिंगणात उतरवण्यात आले आहे. त्यांची लढत इंडि-आघाडीच्या विनायक राऊत यांच्यासोबत आहे. श्री. राणे यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना रत्नागिरीत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याबाबत सूत्रांच्या माहितीनुसार महाराष्ट्र दिनी योगी आदित्यनाथ रत्नागिरीत प्रचाराचे मैदान गाजवतील, असे बोलले जात आहे.दरम्यान, श्री. राणे यांच्या प्रचारासाठी उद्या, दि. २६ एप्रिल रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राजापुरात प्रचार सभा होणार आहे. राणे यांच्या प्रचारासाठी नीतीन गडकरी तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील दौऱ्यावर येणार असल्याचे सांगितले जात आहे.