महाराष्ट्र

भाजप-महायुतीला 20 जागांचा फटका बसणार?

मुंबई – ४ जून रोजी या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील. पण या सगळ्यांत एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित होतोय की, महाराष्ट्राचा कौल कुणाला असणार? राजकीय, सामाजिक प्रचंड उलथापालथ झालेल्या महाराष्ट्रात काय होणार याची उत्सुकता आहे. अशात महाराष्ट्रात भाजप आणि महायुतीला मोठा फटका बसताना दिसत आहे, असे राजकीय विश्लेषक, निवडणूक अभ्यासक आणि सट्टा बाजाराचाही अंदाज आहे. पण, हे असं का घडले याबद्दलची कारणे जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

सध्या जिकडे तिकडे चर्चा सुरू आहे, ती लोकसभा निवडणुकीच्या निकालाची. दहा वर्ष सत्तेत राहिलेले मोदी पुन्हा पंतप्रधान होणार का? भाजपला स्पष्ट बहुमत मिळणार का? एनडीए 400 जागा जिंकणार का? काँग्रेस आणि इंडिया आघाडीचं काय होणार? अशा बऱ्याच प्रश्नांभोवती चर्चांनी फेर धरला आहे. राजकीय अभ्यासक आणि विश्लेषकांकडून महायुतीच्या जागा घटण्याचं कारण दिलं जात आहे, ते एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस.लोकसभा निवडणूक जाहीर होण्याआधी जे ओपिनियन पोल आले, त्यातही महायुतीतील या दोन्ही पक्षामुळे महायुतीच्या जागा घटतील, असे अंदाज काही पोलने मांडले. पण, आता मतदान झाल्यानंतर राजकीय विश्लेषक महायुतीला २० जागांचा फटका बसेल, असं सांगत आहेत.

भाजपला फटका बसण्याचं पहिलं कारण सांगितलं जात आहे, ते म्हणजे दहा वर्ष सत्तेत असल्यामुळे निर्माण झालेला सत्ताविरोधी सूर. दहा वर्ष सरकारमध्ये असल्यामुळे भाजप प्रणित एनडीए विरोधात लोकांची काही प्रमाणात नाराजी तयार झाली आहे. त्यात महागाई, बेरोजगारी हे मुद्दे प्रामुख्याने सांगितले जात आहेत. दुसरी बाब म्हणजे ज्यांच्याबद्दल काही मतदारसंघात नाराजी असलेल्या खासदारांनाच पुन्हा उमेदवारी देण्यात आली. त्याचा फटका विदर्भात आणि इतर काही भागात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कारण इथे नवीन चेहरे दिले असते, तर विद्यमान खासदाराविरोधातील नाराजी कमी झाली असती, अशी चर्चा आहे.