ताज्या बातम्या

११२० लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज

पुणे – अवकाळी पाऊस, गारपीट, वादळी वाऱ्यांसह उष्णतेच्या झळांचा फटका कमी बसल्यामुळे यंदा देशात उच्चांकी ११२० लाख टन गहू उत्पादनाचा अंदाज आहे. मध्य प्रदेशातील गहू काढणी अंतिम टप्प्यात असून, अन्य गहू उत्पादक राज्यांत गहू काढणी सुरू झाली आहे.

केंद्रीय कृषी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, यंदा देशात गहू उत्पादन ११२० लाख टनांवर जाण्याचा अंदाज आहे. गेल्या वर्षीपेक्षा १४ लाख टनांनी उत्पादनात वाढीची शक्यता आहे. २०२२-२३ मध्ये ३३९.२० लाख हेक्टरवर गहू लागवड झाली होती. यंदाच्या रब्बीत १.२१ टक्क्यांनी लागवड वाढून ३४१.५७ लाख हेक्टरवर पोहोचली होती.

देशातील गहू उत्पादनात उत्तर प्रदेशचा वाटा ३०.४० टक्के, मध्य प्रदेशचा २०.५६ टक्के, पंजाबचा १५.१८ टक्के, हरियाणाचा ९.८९ टक्के आणि राजस्थानचा ९.६२ टक्के वाटा आहे. सध्या मध्य प्रदेशात काढणी अंतिम टप्प्यांत आहे. पंजाब, हरियाणा, बिहार आणि उत्तर प्रदेशात आता गहू काढणी सुरू झाली आहे. एप्रिलअखेरपर्यंत गव्हाची काढणी पूर्ण होऊन एकूण उत्पादनाची ठोस आकडेवारी समोर येईल.