मनोरंजन

विद्याला जडलं सिगारेटचं व्यसन

मुंबई – आपल्या अप्रतिम अभिनयाच्या जोरावर विद्या बालनने इंडस्ट्रीत स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे. टीव्हीपासून सुरुवात करणारी विद्या बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री बनली. दाक्षिणात्य अभिनेत्री सिल्क स्मिताची भूमिका तिने ‘द डर्टी पिक्चर’मध्ये साकारली होती. हा चित्रपट सुपरहिट ठरला होता आणि विद्याला त्यासाठी राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला होता. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान विद्याला एक व्यसन जडलं होतं. ‘द डर्टी पिक्चर’नंतर विद्याला धूम्रपान करायची सवय लागली होती. तिने ‘अनफिल्टर्ड बाय समदीश’ या मुलाखतीत याबाबत माहिती दिली. सुरुवातीला ती ऑनस्क्रीन सिगारेट ओढायला तयार नव्हती, पण चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान तिला सिगारेटचं व्यसन जडलं, असं तिने सांगितलं आहे.

विद्या म्हणाली, “या चित्रपटाआधी मी धूम्रपान केलं होतं, मला ते कसं करायचं हे माहित होतं, पण मी धूम्रपान करायचे नाही. पण एखादी भूमिका करताना तुम्ही धूम्रपान करण्याची नक्कल करू शकत नाही. आपल्याकडे धूम्रपान करणाऱ्या स्त्रियांबद्दल एक विशिष्ट समज आहे, त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर तो संकोच असून चालणार नव्हतं. आता महिलांबद्दलचा हा समज खूप कमी झालाय, पण आधी तो खूप होता. ‘द डर्टी पिक्चर’ नंतर सिगारेटचं व्यसन जडलं आणि मी रोज दोन ते तीन सिगारेट ओढत असे,” असंही विद्याने नमूद केलं.