महाराष्ट्र

कोकणाचा कॅलिफोर्निया करणार

रत्नागिरी : कोकणात बेरोजगारीची समस्या मोठी आहे, त्यामुळे भविष्यात कोकणात मोठे उद्योगधंदे आणून रोजगार देणार, मला जर निवडून दिलात तर कोकणचा कॅलिफोर्निया करणार असं वक्तव्य भाजपचे उमेदवार नारायण राणे यांनी केलं. तर नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी जे 400 खासदार निवडून येणार आहे त्यामध्ये नारायण राणे असतील असा विश्वास शिवसेना शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी दिला. रत्नागिरीमध्ये नारायण राणे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी रत्नागिरीकरांना संबोधित करताना नारायण राणे म्हणाले की, कोकणात बेकारी ही समस्या आहे. भविष्यात कोकणात उद्योगधंदे यावेत यासाठी प्रयत्न करणार. तुम्ही मला निवडून दिलं तर मी तुम्हाला रोजगार देणार, बेरोजगारी मिटवणार आणि कोकणचा कोकणाचा कॅलिफोर्निया करणार. मी कुठेही असलो तरी मी कोकणाचा विकास करेन. भारत हा विकसित देश बनवण्याचा संकल्प झाला असून त्यात कोकणातील एक जागा असायला पाहिजे. जगात भारताचे नाव विकसितदेश असं होत असून 2030 साली देशात तिसऱ्या क्रमांकावर येईल. सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये भाजपकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे तर शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मोदींनी 2026 नंतर 33 टक्के महिला आमदार आणि खासदार होतील. त्यामुळे व्यासपीठावर आधी जागा महिलांना असतील. महाराष्टात देशातील सर्वात जास्त गुंतवणूक आली. विरोधकांचं वसुली सरकार होतं, आमचं विकसित सरकार आहे. देशात मजबूत सरकार असल्याने कोकणात विकसित काम सुरू आहेत. जगाची आशा भारत असून त्यामुळे देशात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक येत आहे. नारायण राणे जगाच्या पाठीवर कुठेही असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर कोकण असतं. त्यामुळे राणे कोकणात मोठ्या प्रमाणात विकासाची गंगा आणतील.