महाराष्ट्र

गोळीबार प्रकरणात आणखी दोन आरोपींना अटक

मुंबई – बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या घरावर गोळीबाराची घटना घडल्याने बॉलिवूड विश्वात खळबळ उडाली होती. या घटनेनंतर सलमान खानच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सलमान खानच्या घरी जाऊन त्याची भेट घेतली होती. त्यामुळे, याप्रकरणाची, पोलिसांनी गंभीरतेने दखल घेऊन दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपी सागर पाल आणि विकी गुप्ता यांना 29 एप्रिल दिवसापर्यंत पोलीस कोठडी सुनावली. त्यानंतर, आता पोलीस चौकशीतून आणखी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. त्यातच, याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पंजाबमधून बंदूक पुरवठा करणाऱ्या आणखी दोन आरोपींना अटक केली आहे.

सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबारप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने पंजाबमधून बंदूक पुरवठा करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली. सोनू उर्फ सुभाष चंदर (37 वर्षे) आणि अनुज थापन (32) अशी दोन्ही आरोपींची नावे आहेत. सोनू हा शेती करतो, आणि त्याचे किराणा दुकानही आहे. तर, अनुज थापन ट्रक हेल्पर म्हणून काम करतो, तो लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या संपर्कात होता, त्याच्यावर खंडणी आणि शस्त्रास्त्र कायद्याचे गुन्हे दाखल आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण शाखेला मोठं यश मिळाले आहे. गुजरातच्या सूरतमधील तापी नदीत आरोपींनी फेकलेले दुसरे पिस्तुल पोलिसांनी हस्तगत केले आहे. त्यामुळे, गोळीबार प्रकरणाच्या तपासाला गती मिळाली आहे.