अकोला ताज्या बातम्या

अकोला : ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका; जातनिहाय जनगणना करा

सकल ओबीसी महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला

३० नोव्हेंबर अकोला : मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे; मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नका आणि ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, अशी मागणी करीत ओबीसी महासंघ व अत्यल्प समाज संघटनेच्यावतीने गुरुवार, ७ डिसेंबर रोजी काढण्यात आलेला सकल ओबीसी महामोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला.

ओबीसींच्या संविधानिक आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यात यावे, ओबीसींची जातनिहाय जनगणना करण्यात यावी, या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी ओबीसी महासंघ महाराष्ट्र प्रदेश व अत्यल्प समाज संघटनेच्यावतीने सकल ओबीसी महामोर्चा काढण्यात आला. ओबीसींमधील विविध समाज संघटनांना सोबत घेऊन अकोला क्रिकेट क्लब मैदानजवळून काढण्यात आलेला महामोर्चा अकोला शहरातील विविध मार्गाने मार्गक्रमण करीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकला.संबंधित मागण्यांचे निवेदन एका शिष्टमंडळामार्फत जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्याकडे सादर करण्यात आले.

या मोर्चात ओबीसी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष बालमुकुंद भिरड, प्रदेश कार्याध्यक्ष अ‍ॅड. संतोष राहाटे, अत्यल्प समाज संघटनेचे अध्यक्ष गोपाल राऊत यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, महिला जिल्हाध्यक्ष प्रभा शिरसाट, भारिप बमसंचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे, किरण बोराखडे, तेजस्विनी राहाटे, विजया भिरड, गजानन गवइ, गजानन बोराळे, प्रा.संतोष हुशे,गोपाल कोल्हे, प्रतिभा अवचार, प्रा.मंतोष मोहोड, संजय बावणे, प्रा.सुरेश पाटकर, मीना बावणे, विकास सदांशिव, राम गव्हाणकर यांच्यासह ओबीसींमधील विविध समाजघटकांचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.मोर्चादरम्यान ‘जय संविधान, जय ओबीसी, ओबीसींची जातनिहाय जनगणना झालीच पाहीजे ’ अशा घोषणा देण्यात आल्या. या घोषणांना जिल्हाधिकारी कार्यालय चौक परिसर दणाणून गेला होता.