ताज्या बातम्या

तैवान भूकंपानं हादरला, जपानकडून त्सुनामीचा इशारा

नवी दिल्ली – चीनच्या शेजारी असलेल्या तैवान देशात 7.7 तीव्रतेचा भीषण भूकंप झाला आहे. यामध्ये अनेक इमारती कोसळल्या आहेत. अधिक चिंतेचं कारण म्हणजे, तैवान, जपानचा ओकिनावा परिसर आणि फिलीपाईन्समध्ये त्सुनामीचा इशाराही देण्यात आला आहे. पूर्व तैवानमध्ये भूकंप आल्यानं तिथं इंटरनेट सेवा देखील बंद पडली आहे. तैवानमधला गेल्या 25 वर्षातला हा सर्वात भीषण भूकंप आहे. सप्टेंबर 1999 मध्ये 7.6 तीव्रतेच्या भूकंपात 2 हजार 400 जणांचा मृत्यू झाला आहे.

तैवानची राजधानी तैपेई येथे बुधवारी (3 एप्रिल) सकाळी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 7.5 इतकी मोजली गेली. तैवानमध्ये मोजण्यात आलेली 7.5 रिश्टर स्केलची तीव्रता धोकादायक श्रेणीत मोडते. तैवान सेंट्रल वेदर ॲडमिनिस्ट्रेशननं ही माहिती दिली आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, भूकंपाचे धक्के इतके तीव्र होते की, तैपेईच्या अनेक भागांत वीज गेली. भूकंपानंतर लगेचच शेजारील देश जपान सतर्क झाला आणि त्सुनामीचा इशारा दिला. लोकांना सखल भाग सोडून उंच ठिकाणी जाण्यासही सांगण्यात आलं आहे.

भूकंपाच्या जोरदार धक्क्यांमुळे कोणीही ठार झाल्याची किंवा जखमी झाल्याची कोणतीही बातमी अद्याप मिळालेली नाही. मात्र, सोशल मीडियावर समोर आलेल्या व्हिडीओंमध्ये भूकंपामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन आणि इमारती कोसळल्याच्या बातम्या आहेत. व्होल्कॅनो डिस्कवरीच्या अहवालानुसार, स्थानिक वेळेनुसार सकाळी 9 वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची खोली 35 किमी होती आणि देशाच्या मोठ्या भागात हा धक्का जाणवला. भूकंपाची खोली जास्त असल्यानं त्याच्या केंद्रस्थानी जोरदार धक्के जाणवले आहेत.