महाराष्ट्र

नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली

अमरावती – अमरावतीतून भाजपने नवनीत राणा यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर टीका केली. अशातच ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांची अमरावतीत बोलत असताना जीभ घसरल्याचे अनुभवास आले. बळवंत वानखेडे विरोधात नाचीची लढाई नाही, देशाची लढाई आहे. नाची, डान्सर, बबलीशी बळवंत वानखेडे यांची लढाई नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी अमरावतीच्या उमेदवार नवनीत राणांवर बोलताना केले.

‘बळवंत वानखेडे विरोधात नाची, डान्सर, बबलीशी नाही तर ही लढाई मोदी विरुद्ध महाराष्ट्र अशी आहे. ही लढाई मोदी विरूद्ध उद्धव ठाकरे, ही लढाई मोदी विरूद्ध शरद पवार, ही लढाई मोदी विरूद्ध राहुल गांधी आहे.’ असे राऊतांनी म्हणत हल्लाबोल केलाय. पुढे ते असेही म्हणाले, ज्या बाईने मातोश्रीत घुसण्याचा प्रयत्न केला. मातोश्री आणि हिंदूत्वाबद्दल अपशब्द वापरलेत. त्या बाईचा पराभव करण शिवसैनिकांचं पहिलं आणि नैतिक कर्तव्य असल्याचे संजय राऊत म्हणालेत. ज्या बाईने हिंदुत्वाविषयी अपशब्द वापरले, मातोश्रीला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. त्या बाईचा पराभव करणे हे शिवसैनिकांचे पहिले आणि नैतिक कर्तव्य आहे. तिच्या पराभवात शिवसेनेचे योगदान मोठे असला पाहिजे, हा बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश असल्याचे लक्षात ठेवा, असे देखील खासदार संजय राऊत यांनी सांगितले.

संजय राऊत म्हणाले की, मोदी नावाचा राक्षस घालवायचा असेल तर महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातून महाविकास आघाडीचा खासदार निवडून दिला पाहिजे. भाजपला शिवसेनेने महाराष्ट्रात मोठे केले मात्र त्यांनी गद्दारी केल्यामुळे त्यांच्याशी असलेली युती तोडली. महाराष्ट्र हा कधीच कुणासमोर झुकलेला नाही परंतु मोदी, शहा यांनी शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीला देखील कमजोर करण्याचा प्रयत्न केला. हे फक्त पक्ष फोडाफोडी मध्ये ५६ इंचाची छाती दाखवतात तिकडे चीनचे सैनिक लडाख मध्ये शिरले परंतु मोदी तोंड उघडत नाही कारण मोदी हे डरपोक असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.