अकोला

स्व कल्याणासाठी परमार्थाची गरज-हभप संदिपान महाराज शिंदे

अकोला – संसारात राहून परमार्थ करता येतो. या संसारात अनुकूलता व प्रतिकूलता आहे. मात्र तात्विकदृष्ट्या ती शंभर टक्के कशातही नाही. मात्र संसारात दुखांची निर्मिती सातत्याने होत असते. तर परमार्थाच्या सिद्ध व साधन काळातही दुःख जवळ येत नाही. म्हणून स्वतःच्या आत्मकल्याणासाठी परमार्थाची खरी गरज असून परमार्थ हा स्व कल्याणासाठी आहे. हे मनी बाळगून त्या दृष्टीने वाटचाल करण्याचा हितोपदेश आळंदी येथील कीर्तनकार हभप संदिपान महाराज शिंदे यांनी केला. संत तुकाराम महाराज बिजोत्सव सेवा समितीच्या वतीने हभप प्रशांत महाराज ताकोते यांच्या मार्गदर्शनात गायत्री नगर येथील प्रांगणात सुरु असलेल्या कीर्तन महोत्सवात हभप संदिपान महाराज शिंदे यांनी कीर्तनाचे चतुर्थ पुष्प सादर केले. ते म्हणाले, परमार्थ हा भगवंत प्राप्तीसाठी करावा लागतो. यात साधनेची गरज असते. साधना करीत असताना ती ठामपणे केली पाहिजे. या ठाम पणाची साक्ष साक्षात हृदयाने दिली पाहिजे, तरच खरा परमार्थ करता येतो. सर्वप्रथम आपल्या जन्माला येण्याचे प्रयोजन जीवाला समजले पाहिजे. वेळ व संधी या वेगवेगळ्या बाबी असून आपण जन्माला येणे ही एक अभूतपूर्व संधी असून अनेक जन्माच्या फेर्‍या मधूनच आपणाला हा मानव देह प्राप्त झाला आहे.हा देह देऊन भगवंताने ही आपणास संधी प्रदान केली आहे.

या संधीचा प्रभू प्राप्तीसाठी वेळेत सदुपयोग केला तर या जन्माचे सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आपण केलेल्या साधनेशी आपली बुद्धी अनुकूल झाली पाहिजे. बुद्धी व संचिताची एकता झाली पाहिजे. आपण पुण्य कर्म करतो. त्याची पुण्याई आपल्या परीने सांभाळल्या गेली पाहिजे. कारण आपले पुण्य हिरावून घेण्यासाठी काळ तयार असतो. म्हणून पुण्याचा तोरा प्रकर्षाने प्रकट करू नये. साधकाने आपली साधना एकांतात केली पाहिजे. केलेल्या साधनेची शक्ती संसारिक प्राप्तीसाठी खर्ची करू नये. कारण पुण्याच्या अनुषंगाने आशीर्वादरुपी पुण्याची वजाबाकी सातत्याने होत असते. पुण्य विसर्जन होण्यास हजारो वाटा आहेत तर प्राप्त करण्यास मर्यादित वाटा असल्याचा हितोपदेश हभप संदिपान महाराज शिंदे यांनी यावेळी केला. ते पुढे म्हणाले, शाश्वत समाधानाचे वेगवेगळे प्रकार आहेत. सिद्ध काळातील समाधान व साधन काळातील समाधान हे वेगवेगळे आहे. समाधान हा मानवीय स्थायी भाव आहे. समाधान तात्कालीक व अंतरिक असते. तथापि समाधान हे स्थायी स्वरूपाचे नसते. असे असते तर राजा महाराजांनी या समाधानाकडे पाठ फिरवली नसती.

यासंदर्भात त्यांनी मदालसा या साध्वीची त्यांनी अनुपम कथा प्रतिपादित केली. त्यांनी यावेळी साधना व सिद्धीचा उहापोह केला. सत्र प्रारंभी हभप संदिपान महाराज शिंदे यांनी प्रांगणातील संत गजानन महाराज प्रतिमेचे पूजन केले. यानंतरसमितीच्या वतीने त्यांचे भक्तिभावात स्वागत करण्यात आले.  दि ४ एप्रिल पर्यंत नित्य रात्री ८ ते १० पर्यंत चालणार्‍या या कीर्तन महोत्सवात दि १ एप्रिल रोजी नेवासा येथील उद्धव महाराज मंडलीक यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले असून याचा महिला पुरुष भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत तुकाराम महाराज बीजोत्सव सेवा समिती, गायत्री नगर, कौलखेड रोडच्या समस्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केले.