ताज्या बातम्या

त्याला भूमिका बदलणं म्हणत नाही; राज यांचा उद्धव यांच्यावर हल्ला

मुंबई : गुढी पाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्यात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचे जाहीर केले. राज ठाकरे यांच्या भूमिकेवर उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि प्रकाश आंबेडकर यांच्यासह विरोधकांनी जोरदार टीका केली. मोदींना टीका करणाऱ्यांनीच भूमिका बदलल्याचा हल्ला या नेत्यांनी चढवला. त्याला राज ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्रीपद मिळावं म्हणून किंवा 40 आमदार फुटले म्हणून मी टीका करत नाही.

मोदींच्या सुरुवातीच्या पाच वर्षाची कामगिरी पटली नाही. त्यामुळे मी त्यांना टीका केली. नंतरच्या पाच वर्षात त्यांनी चांगलं काम केलं म्हणून त्यांचं कौतुकही केलं. याला भूमिका बदलणं म्हणत नाही. याला धोरणावर किंवा मुद्द्यांवरचं भाष्य म्हणतात, असा हल्लाच राज ठाकरे यांनी चढवला आहे.
राज ठाकरे यांनी यंदाच्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मनसेचा एकही उमेदवार या निवडणुकीत नसणार आहे. राज ठाकरे यांच्या या भूमिकेमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. तर मनसे पदाधिकारीही या निर्णयावर नाराज झाल्याने त्यांनी राजीनामे द्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे मनसेत खळबळ उडालेली आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी आज एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी अनेक महत्वाच्या विषयांवर भाष्य केले.

2014 च्या आधीच भूमिका ही निवडून आल्यावर तिकडे बदलू शकते तर मलाही भूमिका बदलणं आवश्यक होतं. सगळे म्हणतात, राज ठाकरेंनी भूमिका बदलली पण याला भूमिका बदलणं म्हणत नाहीत, तर धोरणांवर टीका म्हणतात, असे सांगत राज यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता निशाणा साधला. मात्र त्या बदल्यात काही मागितलं नव्हतं. मला मुख्यमंत्री पद हवं म्हणून टीका करतो, माझे 40 आमदार फुटले म्हणून टीका करतोय, असा काही माझा हेतू नव्हता. ज्या भूमिका मला पटल्या नाहीत, त्यावर मी तेव्हा स्पष्टपणे बोललो.

अनेक पेंडिग विषय आहे. तसाच राम मंदिराचा विषय राहू गेला असता. मी अनेक गोष्टींचं स्वागत केलं. चांगल्या होताना दिसतात तेव्हा एका बाजूला कडबोळं आणि एका बाजूला खंबीर नेतृत्व अशावेळी पुन्हा त्यांना एकदा संधी देणं आवश्यक आहे वाटलं. म्हणून मोदींना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचं राज यांनी स्पष्ट केलं. अर्थात महाराष्ट्रासाठी आमच्या काही मागण्या आहेत. त्या त्यांच्यापर्यंत जातील. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यापासून ते गड किल्ल्यांचं संवर्धन असे अनेक विषय आहे. यात अनेक गोष्टी असतात. औद्योगिक दृष्ट्या महाराष्ट्र पुढारला आहे. उद्योगपती प्राधान्य देणारं महाराष्ट्र हे पहिलं राज्य आहे. मोदींना सर्व राज्यांना मुलांसारखं समान असलं पाहिजे. त्यांना गुजरात प्रिय असणं स्वाभाविक आहे. कारण ते गुजरातचे आहे. पाच वर्षात ते सर्व राज्यांना समान पाहतील ही आशा आहे. त्यांना आज पाठिंबा दिला आहे. त्यासाठीच आमच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली, असे राज ठाकरेंनी नमूद केलं.