ताज्या बातम्या

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीचा फ्लॅट आणि बंगला जप्त

मुंबई – पॉर्नोग्राफीप्रकरणी दोन महिने तुरुंगात गेलेला अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा आता बिटकॉईन घोटाळा प्रकरणी अडचणीत सापडला आहे. ईडीने उद्योगपती राज कुंद्राची 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली असून, त्यामध्ये शिल्पा शेट्टीचा जुहू येथील फ्लॅट आणि कुंद्राचा पुण्यातील बंगला आणि शेअर्सचा समावेश आहे. या जप्तीच्या कारवाईमुळे यापूर्वी अनेकदा वादात सापडलेला राज कुंद्रा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

या प्रकरणी दिवंगत अमित भारद्वाज, अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज, महेंद्र भारद्वाज आणि एमएलएम एजंट्सच्या विरोधात महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांनी नोंदवलेल्या अनेक एफआयआरच्या आधारे ईडी तपास करत आहे. आरोपींवर बिटकॉईनच्या रूपात 10 टक्के दरमहा परतावा देण्याचे खोटे आश्वासन देऊन 2017 मध्ये गुंतवणूकदारांकडून 6,600 कोटी रुपये गोळा केल्याचा आरोप आहे. हे पैसे गोळा केल्यानंतर प्रवर्तकांनी बिटकॉईनमध्ये गुंतवणूक केली. मात्र ऑनलाईन वॉलेटमध्ये अवैधरित्या मिळवलेले बिटकॉईन लपवून ठेवण्यात आले. गुंतवणूकदारांना त्यांचे फायदे दिले गेले नाहीत. युक्रेनमध्ये बिटकॉईन मायनिंग फार्म उभारण्यासाठी कुंद्रा याला गेन बिटकॉईन पॉन्झी योजनेचा मास्टरमाईंड आणि प्रवर्तक अमित भारद्वाज यांच्याकडून 285 बिटकॉईन मिळाल्याचा आरोप आहे. हे बिटकॉईन त्याच्याकडे अजूनही असून सध्या त्यांची सध्याची किंमत 150 कोटींपेक्षा जास्त आहे. याच प्रकरणात ईडीने कारवाई करत राज कुंद्रा यांची 97.79 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली.

या प्रकरणात 11 जून 2019 रोजी तक्रारदाराने तक्रार दाखल केली होती. नंतर यावर्षी 14 फेब्रुवारीला त्याने पुरवणी तक्रार दाखल केल्यावर विशेष पीएमएलए न्यायालयाने या तक्रारींची दखल घेतली होती. त्यानंतर याप्रकरणी निखिल महाजन याला 16 जानेवारी 2023 रोजी, सिम्पी भारद्वाज याला 17 डिसेंबर 2023 रोजी आणि नितीन गौर याला 29 डिसेंबर 2023 रोजी अटक करण्यात आली. हे सर्वजण सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. मुख्य आरोपी अजय भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज हे अद्यापी फरार आहेत. याप्रकरणी ईडीने यापूर्वी 69 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. दरम्यान, 2021 मध्ये उघडकीला आलेल्या पॉर्नोग्राफी प्रकरणातही राज कुंद्राचे नाव समोर आले होते. त्यावेळी त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर दोन महिन्यांनंतर त्याला जामीन मिळाला होता.