जालना : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आले असतानाच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी रात्री अचानक आंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. प्रकाश आंबेडकर महाविकास आघाडीची साथ सोडणार असल्याच्या बातम्या येत असतानाच, त्यांनी थेट मनोज जरांगे यांची भेट घेतल्याने राजकीय वातावरण आणखीनच तापण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या दोन्ही नेत्यांमध्ये तासभर चर्चा झाली. त्यामुळे प्रकाश आंबेडकर तिसरी आघाडी तयार करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रकाश आंबेडकर हे आपली भूमिका आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट करणार आहे. मात्र, त्यापूर्वी त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारिणीची रात्री उशिरापर्यंत बैठक घेतली. या बैठकीनंतर प्रकाश आंबेडकर थेट आंतरवाली सराटीमध्ये दाखल झाले. यावेळी त्यांनी तासभर मनोज जरांगे यांच्याशी चर्चा केली. या दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चर्चा झाल्याची माहिती आहे. मात्र, दोघांमध्ये नेमकी काय चर्चा झाली याबाबत वेळ आल्यावर नक्की सांगणार असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहे.