देश

पतंजलीने मागितली ६७ वर्तमानपत्रांमध्ये जाहीर माफी

नवी दिल्ली – पतंजली फसव्या जाहिरात प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे. पतंजलीने सुप्रीम कोर्टाला सांगितले की, त्यांनी ६७ वर्तमानपत्रांमध्ये जाहीर माफी मागितली आहे. येत्या काळात आणखी मोठ्या आकाराची जाहिरात प्रसिद्ध होईल, असे पतंजलीकडून न्यायालयामध्ये सांगण्यात आले आहे. सुप्रीम कोर्टाने या सुनावणीची व्याप्ती वाढवली आहे.

हे प्रकरण फक्त एका संस्थेपुरते म्हणजे पतंजलीपुरते मर्यादित राहणार नाही, अशी महत्त्वपूर्ण टिप्पणी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने केली आहे. दिशाभूल करणा-या जाहिरातींद्वारे उत्पादनांची विक्री करून लोकांच्या आरोग्याशी खेळणा-या इतर कंपन्यांवर काय कारवाई केली? असा न्यायालयाने केंद्र सरकारला सवाल केला आहे.

अ‍ॅलोपॅथी डॉक्टर त्यांच्या प्रिस्क्रिप्शनमध्ये विशिष्ट ब्रँडची महागडी औषधे का लिहून देतात? असा सवाल न्यायालयाने इंडियन मेडिकल असोसिएशनला केला आहे. जाणूनबुजून महागडी औषधे लिहून देणा-या डॉक्टरांची नोंदणी रद्द करण्याची तरतूद आहे का? अशी विचारणा सुप्रीम कोर्टाने राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाला केली आहे.

कोर्टाने या प्रकरणात प्रत्येक राज्याच्या औषध परवाना प्राधिकरणाला पक्षकार बनवले आहे. पतंजली (बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण) प्रकरणाची ३० एप्रिलला सुनावणी होणार आहे. नव्याने व्याप्ती वाढवलेल्या प्रकरणाची ७ मे रोजी सुनावणी होणार आहे.

मागील सुनावणीमध्ये बाबा रामदेव आणि आचार्य बाळकृष्ण यांनी सर्वोच्च न्यायालयात माफीनामा सादर केला होता. मात्र, न्यायालयाने त्यावर कडक ताशेरे ओढत तो माफीनामा स्वीकारला नव्हता. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अमानतुल्ला यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीत खंडपीठाने कडक ताशेरे ओढले होते. ही माफी केवळ समाधानासाठी असल्याचे न्यायालयाने सांगितले होते. तुमच्यात क्षमेची भावना नाही, असे ताशेरे न्यायालयाने ओढले होते. इंडियन मेडिकल असोसिएशनने पतंजलीविरोधात ही याचिका दाखल केली आहे.