महाराष्ट्र

यवतमाळमध्ये भर सभेत नितीन गडकरींना भोवळ

यवतमाळ : देशभरासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राजकीय नेत्यांच्या प्रचार सभाही जोरदार सुरू आहे. तर राज्यात उन्हाचा तडाखाही पाहायला मिळत आहे. अशातच कशाचीही तमा न बाळगता राजकीय नेते आपल्या प्रचारसभा घेतायतं. गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे आमदार कैलास पाटील यांना भर सभेत चक्कर आल्याची घटना घडली होती आणि आज यवतमाळच्या पुसद येथे देखील असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्ताने नितीन गडकरी यांची जाहीर सभा आज यवतमाळच्या पुसद येथे आयोजित करण्यात आली होती.

कार्यक्रमाच्या आयोजनानुसार नितीन गडकरी भाषणासाठी आले. मात्र येथे भाषण करताना त्यांना भोवळ आली. भाषण करत असताना नितीन गडकरी यांना भाषणादरम्यान चक्कर आली आणि ते स्टेजवरच धाडकन कोसळले. त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. नितीन गडकरी यांना भोवळ आल्यानंतर त्यांच्या अंगरक्षकांनी त्यांना सावरल्याचे पाहायला मिळाले. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांना भर सभेत भोवळ येण्याची ही पहिली वेळ नाही. याआधीदेखील त्यांना उन्हामुळे भोवळ आल्याची घटना घडली आहे.