ताज्या बातम्या देश

उत्खननात आढळले १३०० वर्षांहून अधिक जुने मंदिर

हैदराबाद : तेलंगणातील नलगोंडा जिल्ह्यात कृष्णा नदी किनारी वसलेल्या मुदिमानिक्यम गावात उत्खनन सुरु असताना दुर्मिळ शिलालेखासह बादामी चालुक्य काळातील दोन मंदिरे सापडली आहेत. पुरातत्त्वशास्त्रज्ञ जमीनीचे खोदकाम करत असताना त्यांना ही मंदिरे आढळून आली आहेत. त्यातील एक १३०० वर्षांहून अधिक जुने मंदिर असून त्यासोबत १२०० वर्ष जुना असलेला शिलालेखही आढळून आला आहे.
मुदिमानिक्यम गावातील पब्लिक रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ हिस्ट्रीच्या डॉ. एमए श्रीनिवास आणि एस अशोक कुमार यांची टीम हे खोदकाम करत असताना त्यांना दोन मंदिरे आणि ८ व्या किंवा ९ व्या शतकाच्या पूर्वीचा असलेला शिलालेख आढळून आला आहे. हा शिलालेख बादामी चालुक्यकालीन असून त्यावेळी त्यांचे या ठिकाणी राज्य होते. या मंदिरांची अनोखी वास्तुशैली त्यांचे वेगळेपण दर्शवते. या शिलालेखावर ‘गंडालोरुंरु’ असा शब्द लिहिण्यात आला आहे. हा त्या काळातील शब्द आहे. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे संचालक डॉ. मुनिरत्नम रेड्डी यांनी सांगितले की, कन्नडमध्ये ‘गंडा’ हे अक्षर ‘नायक’ दर्शवते. याचा अर्थ कदाचित वीर असा होत असेल. बादामी चालुक्य मंदिरांमध्ये कदंब नागर शैलीचा प्रयोग करण्यात आला आहे. हे तेलंगणातील एक दुर्मिळ वास्तुशिल्प आहे. येथे पंचकुटा नावाने पांच मंदिरांचा समूह आहे. या मंदिरांच्या शिलालेखांवरही गंडालोरुंरु शब्द लिहिलेला आहे.सापडलेल्या दोन्ही मंदिरांची वैशिष्ट्येही खास आहेत. एका मंदिरात शिवलिंगाचा काही भाग शिल्लक आहे, तर दुसऱ्या मंदिरात भगवान विष्णूची मूर्ती आहे, जी पूर्णपणे सुरक्षित आहे. ते पाहून ही मंदिरे त्याकाळी किती भव्य आणि दिव्य होती हे लक्षात येते. येथे किती मोठ्या प्रमाणावर धार्मिक विधी होत असतील, याचा अंदाज आपण लावू शकतो. या ठिकाणी एक भव्य राम मंदिरही असून टांगेडा आणि नागार्जुनकोंडा सारख्या जवळच्या शहरांपासून ते वरंगलसारख्या दूरच्या ठिकाणाहून भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.