महाराष्ट्र

महापालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धती !

मुंबई : मुंबई वगळता राज्यातील सर्व महापालिकांमध्ये पुन्हा एकदा चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्याबाबतचे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात संमत करण्यात आले. गुरुवारी राज्य मंत्रीमंडळाच्या बेैठकीत याबाबत निर्णय घेऊन आज घाईघाईने हे विधेयक मंजूर करण्यात आले. प्रभाग पद्धतीत वारंवार केल्या जाणा-या बदलावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, शिवसेनेच्या ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी टीका केली.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मुंबई वगळता इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत लागू केली होती. मात्र आता महायुती सरकारने तो निर्णय बदलत पुन्हा चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्याचे विधेयक संमत करून घेतले. प्रभाग पद्धत बदलली असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार याबाबत संभ्रम कायम आहे.महानगरपालिकांमध्ये चार सदस्यीय प्रभाग पद्धत लागू करण्यात आली असली तरी नगरपालिका आणि नगरपंचायतींमध्ये तीन सदस्यीय प्रभाग आणि नगराध्यक्षांची थेट निवडणूक कायम राहणार आहे.
२०१७ मध्ये भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना बहुसदस्यीय म्हणजेच चार सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यात आली होती. त्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकारने सन फडणवीस सरकारचा निर्णय रद्द करून पुन्हा एकदा एकसदस्यीय प्रभाग रचना लागू केली. त्यानंतर पुन्हा मविआ सरकारनेच सप्टेंबर २०२१ मध्ये तीन सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय घेतला. मविआ सरकारच्या काळात महानगरपालिकेत तीन प्रभाग पद्धतीचे विधेयक त्यावेळी नगरविकास मंत्री असलेले आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले होते. त्यामुळे ते कोणाच्या विचाराने चालतात हे उघड होते. नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पद्धत कायम का ठेवली आहे? मागील चार वर्षांपासून राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या आहेत. त्या निवडणुका घेण्यात काय अडचण आहे तुम्हाला ? असा सवाल विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी केला. तर भास्कर जाधव यांनी हे कायदेमंडळ आहे व विधेयकावर विस्तृत चर्चा होऊन ते मंजूर करणे आवश्यक असताना एवढी घाई कशासाठी असा सवाल केला.