आंतरराष्ट्रीय

चार हजार वर्षांपूर्वीच्या उल्कापाताने सिंधू संस्कृतीचा ऱ्हास?

टोरांटो – गुजरातमध्ये सुमारे चार हजार वर्षांपूर्वी एक उल्का कोसळली होती. या धडकेने निर्माण झालेले एक विवर तिथे आजही पाहायला मिळते. ते गेल्या ५० हजार वर्षांच्या काळातील पृथ्वीला धडकलेल्या सर्वात मोठ्या उल्केचे विवर असू शकते, असा दावा एका नव्या संशोधनात करण्यात आला आहे. या धडकेने जमिनीला हादरे बसले असावेत, आग व धुराचा फैलाव झाला असावा. सिंधू संस्कृतीमधील लोकांचा र्‍हास कदाचित याच आपत्तीने झाला असावा, असे संशोधकांना वाटते.

कच्छमध्ये उल्कापाताची खूण असलेले विवर पाहायला मिळते. ते १.८ किलोमीटर रुंदीचे आहे. त्याला ‘लूना स्ट्रक्चर’ असे म्हणतात. हे विवर लूना गावाच्या जवळ आहे. महाराष्ट्रातील लोणार आणि राजस्थानातील रामगढनंतरचे हे तिसरे मोठे विवर आहे, जे अंतराळातून आलेल्या खगोलाच्या धडकेमुळे तयार झाले आहे. लूना स्ट्रक्चरचे भू-रासायनिक विश्लेषण सांगते की, या ठिकाणच्या मातीत मोठ्या प्रमाणात इरीडियम मिसळलेले आहे. त्यावरून असे दिसते की, इथे एक लोहयुक्त उल्का धडकली असावी. या ठिकाणी उल्केशी संबंधित वुस्टाईट, किशस्टिनाईट, हर्सिनाईट आणि उलवोस्पिनलही सापडले आहे. सुमारे ४,०५० वर्षांपूर्वी ही धडक झाली असावी असा अंदाज आहे.