विदर्भ

ब्रह्मदेव आला तरी आता माघार नाही, बच्चू कडूंचे नवनीत राणांना आव्हान

मुंबई : अमरावतीमध्ये भाजपा उमेदवार नवनीत राणा यांना आमचा विरोध असून ब्रह्मदेव जरी आला तरी आम्ही आता माघार घेणार नाही, असा निर्धार प्रहार संघटनेचे सर्वेसर्वा आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी शुक्रवारी व्यक्त केला. कडू यांच्या निर्धारामुळे महायुतीची डोकेदुखी वाढली आहे. मला सागर बंगल्याची भीती दाखविणाऱ्या आमदार नितेश राणे यांनाच सागर बंगल्याची भीती असेल आम्हाला नाही. आमचा नेता दिल्लीत नाही तर, गावात बसलेला मायबाप शेतकरी आहे, असे प्रत्युत्तरही बच्चू कडू यांनी भाजप आमदार नितेश राणे यांना दिले आहे.

अमरावतीमधून नवनीत राणा यांना भाजपाने उमेदवारी दिली असून त्याला बच्चू कडू यांनी विरोध केला आहे. राणा यांच्या उमेदवारीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातूनही विरोध आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू नावाचे वादळ आमच्या सागर बंगल्यात शमवले जाईल, असा टोला नितेश राणे यांनी लगावला होता. त्यावर प्रसारमाध्यमांशी बोलताना कडू यांनी उत्तर दिले. सागर बंगल्याची भीती नितेश राणे यांना असेल, आम्हाला नाही. ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आम्ही अमरावतीतून माघार घेणार नाही. आमचा स्वाभिमान आहे. गुलामीत राहण्याची आम्हाला सवय नाही. आम्ही सर्व ताकदीनिशी लढू, असा निर्धारच बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केला.