ताज्या बातम्या देश

लोकसभेत उडी मारणारे ते दोघे कोण ?

नवी दिल्ली, १३ डिसेंबर : आज संसदेवर झालेल्या हल्ल्याला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. याच दिवशी नव्या संसदेतील प्रेक्षक गॅलरीतून लोकसभेत उडी मारून रंगीत धुराच्या नळकांड्या सोडल्या. यामुळे काही वेळासाठी लोकसभेत एकच गदारोळ झाला.

खासदारांनी अत्यंत हिंमतीने या दोघांनाही पकडले आणि सुरक्षा दलांच्या ताब्यात दिले. त्याचदरम्यान लोकसभेबाहेर संसद भवन परिसरातही रंगीत धुराच्या नळकांड्या घेऊन आंदोलन करण्यात आले. या दोन्ही घटनांत एकूण चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. यात अमोल शिंदे (२५, जि. लातूर, महाराष्ट्र), नीलम कौर सिंह (४२, हिस्सार, हरियाणा), याशिवाय आणखी दोघांना ताब्यात घेतले आहे. त्यातील एकाचे नाव सागर असल्याची माहिती आहे.

अटक केलेल्यांची पार्श्वभूमी

अमोल मूळचा लातूरच्या चाकूर तालुक्यातील नवकुंडझरी गावचा राहणारा आहे. त्याच्या घरची परिस्थिती बेताची आहे, आई वडील मजूरी करतात, अमोल लष्कर आणि पोलीस भरतीची तयारी करत होता. ९ तारखेला भरतीसाठी जात असल्याचे सांगून तो घरातून बाहेर पडला होता. चाकूर येथील पोलीस त्याच्या घरी दाखल झाले आहेत आणि त्यांच्या आई वडीलांची चौकशी करत आहे.

काय म्हणणे आहे महिलेचे

माझं नाव नीलम आहे. आपलं भारत सरकार आमच्यावर अत्याचार करत आहे. आम्ही जेव्हा हक्काविषयी मागणी करतो तेव्हा आमच्यावर लाठीचार्ज केला जातो. आम्हाला तुरुंगात टाकलं जातं आणि आम्हाला टॉर्चर केले जाते. त्यामुळे आमच्याकडे काही माध्यम नव्हतं. आम्ही कोणत्याही संघटनेतून नाही. आम्ही सामान्य जनता आहोत, विद्यार्थी आहोत. आम्ही बेरोजगार आहोत. आमचे आई वडील इतके काम करतात. पण कोणाचेच म्हणणं ऐकून घेतलं जात नाही. हे लोक नेहमीच आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करतात.