मुंबई

उमेदवारांच्या मिरवणुकांवर लक्ष; सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे निर्देश

मुंबई – ”लोकसभा सार्वत्रिक निवडणूक – २०२४” च्या अनुषंगाने मुंबई शहर जिल्ह्यातील निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्रे भरण्याची सुरुवात लवकरच होत आहे. ही नामनिर्देशन पत्रे भरतेवेळी उमेदवारासमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते मिरवणूक स्वरूपात येत असतात. ही बाब लक्षात घेता या मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या, वाहने, केला जाणारा खर्च इत्यादींची छायाचित्रांसह व व्हिडिओ छायाचित्रणासह सुयोग्य नोंद ठेवण्याचे निर्देश ”दक्षिण मध्य मुंबई”चे निवडणूक निर्णय अधिकारी तथा कोकण विभागाचे अपर आयुक्त विकास पानसरे यांनी दिले आहेत. ”ओल्ड कस्टम इमारती”च्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला मार्गदर्शन करताना पानसरे यांनी हे आदेश दिले आहेत. या बैठकीला भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी प्रवीण मुंडे यांच्यासोबत जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी आणि मुंबई पोलीस दलातील संबंधित अधिकारी देखील उपस्थित होते.

या बैठकीला मार्गदर्शन करताना पानसरे यांनी सांगितले की, नामनिर्देशन पत्रे भरण्यासाठी येणाऱ्या उमेदवारांसमवेत मोठ्या संख्येने कार्यकर्ते मिरवणूक स्वरूपात येत असतात. या कार्यकर्त्यांची संख्या, त्यांच्या वाहनाचे क्रमांक व वाहनांचा तपशील, मिरवणुकी दरम्यान वितरित होणारे खाद्यपदार्थ इत्यादींवर कडक व काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याचे निर्देश पानसरे यांनी दिले आहेत. याकरिता आवश्यकतेनुसार मुंबई पोलीस दल व बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्याकडे असणारे आवश्यक ते सीसीटीव्ही फुटेज देखील काळजीपूर्वक पडताळून पाहण्याचे आदेशही पानसरे यांनी दिले आहेत.