महाराष्ट्र

पुण्यात नवीन शैक्षणिक वर्षात मुलींना लस मिळणार

मुंबई – पुणे महापालिकेच्या शाळेतील आठवी आणि नववीच्या मुलींना सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस दिली जाणार होती. त्यासाठी पालिकेच्या आरोग्य विभागाने २ हजार ५०० सर्व्हायकल कॅन्सर रोधक लस खरेदी करण्याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली होती.पण राज्य सरकारच्या उदासीन भुमिका आणि आचारसंहितेमुळे पालिकेला ही लस खरेदी करता येणार नाही. त्यामुळे आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यानंतरच मुलींना ही लस मिळू शकणार आहे. स्त्रियांमध्ये आढळणारा हा कर्करोग आहे. सुरुवातीला या कर्करोगाची कोणतीही लक्षणं आढळून येत नाहीत. कर्करोग गर्भाशयाच्या सर्वात खालच्या भागाच्या गर्भाशयाच्या पृष्ठभागावर सुरू होतो, म्हणून त्याला सर्वायकल कॅन्सर असं म्हणतात.

पालिकेच्या आरोग्य विभागाकडून लस खरेदीसाठी जानेवारी महिन्यात निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. ८ फेब्रुवारी हा निविदा भरण्याचा अंतिम कालावधी होता. ही लस राज्य सरकार कडूनच खरेदी करण्यात येणार होती. दोन वर्षासाठी लस या माध्यमातून घेण्यात येणार होती. मात्र महापालिकेने सगळी प्रक्रिया पूर्ण करून देखील सरकार कडून कसलाही प्रतिसाद देण्यात आला नाही. जेव्हा सरकारला वेळ मिळाला तेव्हा लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली होती. त्यामुळे सरकार कडून आचारसंहितेचे कारण देत खरेदी प्रक्रिया रखडवून ठेवण्यात आली. लस खरेदी झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या शाळेतील इयत्ता आठवी आणि नववीमधील मुलींना हे लसीकरण करण्यात येणार होती. पहिल्या टप्प्यात नववीतील आणि त्यानंतर इयत्ता आठवीच्या मुलींनाही लसीकरण करण्यात येणार होते. लस खरेदी झाली असती तर मार्च चा शेवटचा आठवडा किंवा एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात हे लसीकरण केले जाणार होते. मात्र आता आचारसंहिता झाल्यानंतरच लस खरेदी करण्यात येणार आहे.