देश

विमानातील मद्याचे प्रमाण मार्गदर्शक तत्वे येणार

नवी दिल्ली – विमानात प्रवाशांना देण्यात येणाऱ्या मद्याचे प्रमाण निश्चित करण्यासाठी त्याचप्रमाणे प्रवाशांच्या वागणूकीवर निर्बंध आणण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याबाबतचे प्रतिज्ञापत्र आज डायरेक्टर जनरल ऑफ सिविल एव्हीएशनने सर्वोच्च न्यायालयात सादर केले. २०२२ मध्ये न्युऑर्क ते दिल्ली विमानप्रवासात एका प्रवाशाने आपल्या सहप्रवासी महिलेच्या अंगावर लघूशंका केली होती. या प्रकरणी महिलेने दाखल केलेल्या याचिकेत विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या वागणूकीसंदर्भात मार्गदर्शक तत्वे तयार करण्याची मागणी केली होती.

या याचिकेच्या सुनावणी दरम्यान डीजीसीए ने हे प्रतिज्ञापत्र सादर केले. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी म्हटले आहे की, विमानात प्रवाशांना किती मद्य द्यायचे ते त्या त्या कंपनीचे धोरण असते. अर्थात नागरी उड्डाण विभाग त्याचा निर्णय घेत असतो. अशा प्रकारच्या गैरवर्तणूक करणाऱ्या प्रवाशांवर बंधन आणण्यासाठी निश्चित धोरण तयार करण्यात येईल.

या महिलेने गैरवर्तन करणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध टाकण्याची मागणी केली होती. त्यावर विमान प्रवासात नेमके किती मद्य द्यावे याचे प्रमाण ठरवण्याचीही मागणी केली होती. विमान कंपनीने आधी त्या प्रवाशाला मद्य दिले त्यानंतर तो हे गैरकृत्य करण्यास धजावला असेही त्या महिलेने आपल्या याचिकेत नमूद केले आहे.