अमरावती

थकीत बिलासाठीचे फेक कॉल ओळखा: महावितरण

अमरावती – वीज बिलासंदर्भातही आता फेक कॉल करण्यात येत असल्याचा प्रकार उघड झाला आहे. अलीकडच्या काळात फेक कॉल करून फसवणूक करण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.

महावितरणकडून बोलत आहे, तुमचे मागील महिन्याचे वीज बिल भरले नाही, तर लाइट कट होईल, असे सांगून वीजबिल भरण्याच्या सूचना करण्यासह एक अॅप्लिकेशन डाऊनलोड करायला सांगितले जाते. अॅप्लिकेशन डाऊनलोड केल्यानंतर मोबाइलचा पूर्ण ताबा मिळविला जातो. काही क्षणातच बँक खात्यातून परस्पर रक्कम ट्रान्सफर करून खाते साफ करण्यात येत आहे, असा गैरप्रकार प्रकार सुरू असल्याचे महावितरणने कळविले आहे.अलीकडे ऑनलाईन फ्रॉडच्या घटना वाढीस लागल्या आहेत. विविध प्रकारचे अॅपस् सोशल मिडीयावर दाखल होत आहेत. त्यामुळे कोणते खरे आणि कोणते खोटे खातरजमा करण्यात अडचणी आहेत.