राजकीय

सुषमा अंधारेंविरोधात कारवाई करण्याची मागणी

मुंबई – राजकीय फायद्यासाठी किंवा निवडणूक प्रचारात लहान मुलांचा वापर कोणत्याही परिस्थितीत निषेधार्थ आहे. मात्र, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी निवडणूक आयोगाचे नियम हे धाब्यावर बसवले आहेत. नागपूर येथे वर्ध्याचे खासदार आणि महायुतीचे उमेदवार रामदास तडस यांच्या विरोधात पत्रकार परिषद घेताना सुषमा अंधारे यांनी तडस यांचा १७ महिन्यांच्या नातवाला देखील मंचावर उपस्थित केलं होतं. आता राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा ॲड. सुशीबेन शहा यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकारी राजीव कुमार आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांना पत्र लिहिलं आहे, याबाबत कठोर कारवाईची मागणी केली.

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या निर्देशानुसार, प्रचारसभा, मोर्चा, घोषणाबाजी, पोस्टर चिकटवणे अशा निवडणुकीसंदर्भात कोणत्याही कामासाठी लहान मुलांचा वापर केला जाऊ शकत नाही. राजकीय नेत्यांनी आणि उमेदवारांनी लहान मुलांना हातात धरुन, वाहनात किंवा रॅलीमध्ये घेऊन जाणे. तसेच कोणत्याही प्रकारे प्रचाराच्या कामांसाठी मुलांचा वापर करू नये, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत.

कविता, गाणी, उच्चारलेले शब्द, राजकीय पक्ष/उमेदवार यांच्या चिन्हाचे प्रदर्शन, राजकीय पक्षाच्या विचारसरणीचे प्रदर्शन, एखाद्या पक्षाच्या यशाचा प्रचार यासह कोणत्याही प्रकारे राजकीय मोहिमेचे स्वरुप निर्माण करण्यासाठी मुलांचा वापर करण्यापर्यंत विस्तारित आहे. यात विरोधी राजकीय पक्ष किंवा उमेदवार यांच्यावर टीका करण्यासाठीही मुलांचा वापर होऊ शकत नाही; असे निर्देश निवडणूक आयोगाने स्पष्ट शब्दांत दिले आहेत, अशी माहिती ही ॲड. शहा यांनी दिली.

सुषमा अंधारे यांनी राजकीय स्वार्थासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशांची पायमल्ली केल्याचं स्पष्ट होत आहे. महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली असून आयोग स्तरावर याची चौकशी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या माध्यमातून या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी ॲड. सुशीबेन शहा यांनी पत्राद्वारे केली.