ताज्या बातम्या महाराष्ट्र

महाराष्ट्र-छत्तीसगड बॉर्डरवर नक्षलवादी आणि पोलिसांदरम्यान चकमक!

चकमकीत दोन पोलीस शहीद!

गोंदिया, 20फेब्रुवारी: 20फेब्रुवारीच्या सकाळी 8 ते 8.30वाजता दरम्यान महाराष्ट्र-छत्तीसगड बॉर्डरवर छत्तीसगडच्या हद्दीत येत असलेल्या बोरतलाव चौकी येथे नक्षलवादी आणि पोलिसांमध्ये झालेल्या चकमकीत दोन पोलीस शहीद झाले असून,एक जण गंभीर जखमी झाला आहे.

या बाबत मिळालेल्या माहिती नुसार थोडक्यात हकीकत अशी आहे की , छत्तीसगड राज्यातील बोरतलाव पोलीस चौकीअंतर्गंत आज सकाळी 8.30 वाजेच्या सुमारास 10-12 महिला पुरुष नक्षल्यांच्या टोळीने विनाशस्त्र चहा पिण्याकरीता गेलेल्या दोन पोलिसांना ठार केल्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर महाराष्ट्र आणि छत्तीसगड सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त वाढविला असून जंगलात सर्चिंग सुरु करण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज बोरतलाव पोलीस चौकीतील राजेश प्रतापसिंह आणि ललीत यादव आपल्या एका सहकारी मित्रासह मोटारसायकलने चहा पिण्याकरीता गेले.

आधीच त्या परिसरात दबा धरुन बसलेल्या नक्षल्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. यात दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला तरएकजण जखमी झाला आहे. यावेळी नक्षलवाद्यांनी मोटारसायकलला आग लावून घटनास्थळावरुन पळ काढला.