ताज्या बातम्या मनोरंजन

‘केबीसी’मध्ये तुळशीराम डाकेने प्रेरित केले बिग बींना

मुंबई, 8 डिसेंबर (हिं.स.) : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील कौन बनेगा करोडपती 15 या लोकप्रिय गेम शोमध्ये या आठवड्यात होस्ट अमिताभ बच्चन यांच्या समोर हॉट सीटवर बसलेले दिसतील बीड जिल्ह्यातील म्हाळस गावातून आलेले विश्वास तुळशीराम डाके. त्यांची चतुर खेळी आणि त्याच बरोबर त्यांच्या प्रेरणादायक कहाणीने केवळ होस्ट अमिताभ बच्चन यांचेच नाही, तर सेटवर उपस्थित सर्वांचेच लक्ष वेधून घेतले.

गरीब घरातून आलेले विश्वास उपजीविकेसाठी शेतीकाम करतात. आपल्या वडिलांच्या अकाली मृत्यूनंतर घर चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. आणि त्यामुळे त्यांना आपले शिक्षण पूर्ण करता आले नाही. पण कौन बनेगा करोडपतीमध्ये जिंकण्याच्या आशेने त्यांना प्रोत्साहित केले आणि स्वस्थ बसू दिले नाही. ही एक शेतकऱ्याची गोष्ट आहे, जो कधीही हार मानत नाही. महिन्याला 20000 रु उत्पन्न असलेल्या विश्वासने या शोमध्ये 12,50,000/- रु. जिंकले. होस्ट अमिताभ बच्चन यांच्याशी गप्पा-गोष्टी करताना त्यांनी आपल्या प्रिय पत्नीविषयी सांगितले, जिने आपला पती फास्टेस्ट फिंगर फर्स्ट मध्ये निवडून येईपर्यंत दर सोमवारी उपवास करण्याचा नेम पाळला. आपल्या आयुष्यात शिक्षणाची भूमिका किती महत्त्वाची असते, याविषयी देखील ते बोलले.

बक्षीसाची भली मोठी रक्कम जिंकल्याचा आनंद व्यक्त करताना विश्वास तुळशीराम डोके म्हणाले, “या जीवनात मला नवजीवन दिल्याबद्दल मी ईश्वराचे आणि कौन बनेगा करोडपतीच्या मंचाचे आभार मानतो. मी बारावीत होतो, त्यावेळी फी भरण्याचे पैसे जवळ नसल्यामुळे मी माझे शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. या शोमध्ये जिंकून बक्षीसाची रक्कम घरी घेऊन जाताना मला खूप आनंद होत आहे, कारण आता माझ्या मुलांचे भविष्य मी सुरक्षित करू शकेन. हा शो मी खूप आवडीने बघतो. यातून प्रत्येक प्रेक्षकाला कधीही हार न मानण्याचे बळ मिळते. उलट, तुम्हाला आपली स्वप्ने साकार करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची आणि स्वप्ने साकार होईपर्यंत झुंजत राहण्याची स्फूर्ती यातून मिळते.