अकोला प्रतिनिधी२७ऑगस्ट:-अल्पवयीन मुलींचा विनयभंग केल्याच्या आरोपाखाली पोलिस निरीक्षक विजय पाटकर यांच्याविरुद्ध सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिसांनी गुरुवारी केली. १७ वर्षीय मुलीने सिव्हिल लाइन्स पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्या तक्रारीत आरोप केला की, ‘ २१ ऑगस्ट २०२१ रोजी संध्याकाळी सात साडेसात वाजता दरम्यान आपण आणि चुलत बहीण दोघी स्टेशनरीसाठी बाहेर गेलो होतो. परत येत असताना वाटेत विजय पाटकर यांनी विनयभंग केला. त्यानंतर आपण घाबरून जावून घरी पळत गेलो. आईवडिलांना हकीकत सांगितल्यानंतर आईवडिलांसह पाटकर यांच्या घरी गेलो असता त्यांच्या पत्नी व मुलीने जातीवाचक शिविगाळ केली व पाटकर यांनी आपण पोलिस खात्यात ठाणेदार आहोत. मी कुणाचा खून आणि बलात्कार केला तरी माझे कुणीही काहीही करू शकत नाही, असे म्हणून अपमानित केले. तसेच तुमच्या कुटुंबाला चोरी डकेती, छेडछाड, बलात्काार व ३९२,३९५ सारख्या गुन्ह्यामध्ये अडकवतो व जेलमध्ये सडवतो आणि तुम्हाला एकेकाला जीवाने मारून टाकतो.’ अशा तक्रारीवरून सिव्हिल लाइन्स पोलिसांनी आरोपी विजय पाटकर यांच्यासह त्यांची पत्नी आणि मुलीविरुद्ध भांदविचे कलम ३५४ अ, ३५४, २९४, ५०६,३४ आयपीसी सहकलम ११,१२ पोस्को अॅक्ट तसेच अ.जा. अप्र. कायदा २०१५ नुसार गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा तपास सिव्हिल लाइन्स पोलिस करीत आहेत.