क्राईम

: चारित्र्याच्या संशयावरून पतीने केली पत्नीची हत्या!  एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल 

अकोला प्रतिनिधी२७ऑगस्ट:-
चारित्र्याच्या संशयावरून पतीने पत्नीला मारहाण केली. त्यात पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारच्या रात्री शिवर येथे घडली. गुरुवारी सकाळी घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे.
ज्योती मांडोकार असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. तर नितेश उर्फ भारत सुखदेव खरात वय ३९ असे अटक करण्यात आलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. ज्योती ही आरोपी नितेश याची दुसरी पत्नी आहे. तिला दोन मुले आहेत. एक दीड वर्षाचा मुलगा तर दुसरी मुलगी पाच वर्षाची आहे. ज्योती आणि नितेश यांच्यामध्ये वाद होते. नितेश हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. बुधवारी दोघांमध्ये वाद झाले. वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. यावेळी नितेशने पत्नीला लाथाबुक्यांनी आणि नंतर काठीने मारहाण केली. त्यात तिचा मृत्यू झाला. गुरुवारी सकाळी घटनेची माहिती एमआयडीसीचे ठाणेदार किशोर वानखडे सह डीबी स्कॉड पथकाचे पोहेकॉ. दयाराम राठोड, निलेश भोजने, संतोष डाबेराव यांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. यावेळी पत्नीला कुणीतरी मारले असावे, असे आरोपी सांगू लागला. त्यानंतर पोलिसांनी संशयावरून तिघांना ताब्यात घेतले होते. मात्र सखोल तपास केल्यानंतर पती नितेश हाच तिचा मारेकरी असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविरुद्ध भांदविचे कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन कदम यांनी घटनास्थळाला भेट देत पोलिसांना तपासाच्या सूचना दिल्या होत्या.
…………….
आरोपीला दोन बायका 
आरोपी नितेश उर्फ भारत सुखदेव खरात याला दोन बायका आहेत. पहिल्या पत्नीपासून त्याला पाच चार मुली आहेत. तर दुसरी पत्नी ज्योतीपासून दोन मुले आहेत. पहिली पत्नी खरप येथे माहेरी राहते. घटनेनंतर आरोपीने तो मी नव्हेच असा बनाव केला होता. मात्र एमआयडीसी पोलिसांनी ज्योतीचे माहेर असलेले केळीवेळी येथून माहिती घेतल्यानंतर तो तिला नेहमी मारहाण करत होता हे समोर आल्याने पोलिसांनी त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली.