संपादकीय

संपादकीय : व्यवस्थेविरुद्ध बंड

वसईकर श्रद्धा वालकरची दिल्लीत तिच्या कथित मित्राने केलेली निर्घृण हत्या दुर्मिळातले दुर्मीळ प्रकरण मानले जात असतानाच हरियाणातील झज्जर इथली निक्की यादव आणि मुंबईजवळ पालघर येथील मेघा या दोघींच्या त्यांच्या लिव्ह इन नातेसंबंधातील जोडीदारांनी केलेल्या हत्या या हिंसेच्या टोकाचे हिडीस स्वरूप दाखवणार्‍या आणि म्हणूनच प्रत्येक सहृदयी माणसाचे मन विदीर्ण करणार्‍या आहेत.

स्त्री-पुरुष ही खरे तर निसर्गाची सुंदर पण दोन टोके असलेली निर्मिती. ते दोघे एकत्र येऊन जी काही जीवनाची निर्मिती करतात, त्यावर माणसाच्या जगाचा डोलारा हजारो वर्षे उभा आहे. एकाच वेळी आदिम आणि नित्यनूतन, रसरशीत असे हे नाते. निदान भारतात तरी ते कसकसे विकसित होत गेले याची झलक ‘भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास’ या इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांच्या पुस्तकातून पाहायला मिळते. प्रचलित विवाहसंस्था हे त्याचे त्यातल्या त्यात आधुनिक रूप असले तरी गेल्या काही वर्षांमध्ये आपल्याकडे रूढ होत असलेली लिव्ह इन रिलेशनशिप हे या नातेसंबंधाला मिळालेले नवे वळण म्हणता येईल.

त्याचा उल्लेख इथे यासाठी केला की वरील तिन्ही प्रकरणांमधली जोडपी लिव्ह इन नातेसंबंधात राहणारी म्हणजेच लग्न न करता एकत्र राहणारी होती. त्यामुळे भारतीय संस्कृतीत न बसणार्‍या गोष्टी केल्यामुळेच हे सगळे कसे होते आहे, अशा चर्चा सालाबादप्रमाणे सुरू झाल्या. आपल्यातील हिंसेचे विकृत रूप दाखवणार्‍या या तीन पुरुषांच्या उदाहरणामुळे सगळेच पुरुष हिंस्र किंवा विकृत ठरत नाहीत, तसेच या तीन उदाहरणांमुळे सगळेच लिव्ह इन नातेसंबंध हिंस्र ठरत नाहीत, हेही लक्षात घेणे आवश्यक आहे.खरे तर परस्परविश्वास हा स्त्रीपुरुष नात्याचा पाया. विश्वासाने आपल्याबरोबर राहायला येणारा जोडीदार, मग तो स्त्री असो की पुरुष त्याची अत्यंत निर्घृणपणे हत्या करणे,

मृतदेहाचे तुकडे करून प्रिâजमध्ये ठेवून अत्यंत थंड डोक्याने त्याची विल्हेवाट लावणे ही क्रौर्याची परिसीमा आहे, यात कसलीच शंका नाही. पण प्रेमाचे नाते या टोकाला जात असताना त्या नातेसंबंधातील व्यक्तीला काही तरी बिनसत असल्याचे लक्षात येत नसेल का? आले तर त्यातून वेळीच बाहेर का पडता आले नसेल? या तिन्ही युवतींना त्यांच्या सहचर पुरुषाच्या वर्तनात काही बदल वा खोट सापडून त्यांना या नात्याच्या जंजाळातून स्वत:ची सुखरूप सुटका करून घेता आली नाही, की चौकटीबाहेर जाण्याचे त्यांनी दाखवलेले धैर्य टिकवून ठेवण्याच्या प्रयत्नांमध्ये नाते टिकवून ठेवण्याचे त्यांचे प्रयत्न फसले, याचा अंदाज येणे कठीण आहे.

प्रेमाच्या शोधात असलेल्या जोडीदाराच्या प्रेमाचा अनादर करत, त्यांच्या सहचराने अमानवी पद्धतीने त्यांची हत्या करणे, अधिक गंभीर आणि एकूणच समाजव्यवस्थेतील दोषांकडे बोट दाखवणारे आहे. कारण मुलींसाठी लग्नव्यवस्था ही आधीच साचेबद्ध आहे. या साच्यातून आपली वेगळी वाट निवडताना त्यांनी स्वत:पासून ते समाजापर्यंत किती संघर्ष केलेला असू शकतो, याची कल्पना कुणीही करू शकेल. त्यांच्या या निर्णयात त्यांना साथ देणार्‍या किंवा विरोध करणार्‍या त्यांच्या पालकांची अवस्था तर आणखीनच केविलवाणी झाली असणार. कारण वर्तमानात अशा परिस्थितीत दोषांचे पहिले खापर फुटणार ते त्यांच्यावर. शतकानुशतके चालत आलेल्या विवाहसंस्थेच्या बाहेर जाऊन ‘लिव्ह इन’मध्ये राहू पाहणार्‍या आपल्या मुलीच्या प्रयोगाकडे व्यापक दृष्टीने पाहणार्‍या पालकांच्या धैर्याचे खरे तर कौतुक व्हायला हवे. कारण लग्नसंस्था हा जसा सहजीवनाचा एकमेव पर्याय नाही, तशीच ती अपरिवर्तनीय नाही, हे स्वीकारायलाही खुली मानसिकता लागते. कारण विवाहसंस्थेत मारून-मुटकून नाती टिकवण्याच्या हट्टापायीही अनेकांचे मानसिक खच्चीकरण होत असते. रीतसर विवाह करून एकत्र राहणार्‍या प्रत्येक जोडप्याच्या ‘स्वर्गा’त बांधलेल्या लग्नगाठी मजबूत असतात असेही नाही.

परंतु विवाह झाल्यानंतर एकमेकांशी पटत नसेल, एकमेकांचे जमत नसेल तर फारकत घेण्याची एक कायदेशीर व्यवस्था तरी उभी असते. आजकाल ती समाजमान्य होऊ लागली आहे. पण ‘लिव्ह इन’ व्यवस्थेचा पायाच एकमेकांस समजून घेत आयुष्यात पुढे जाण्याची शक्यता आहे किंवा कसे, याची तपासणी करण्याचा असताना, केवळ परंपरेला छेद देऊन हा नातेसंबंध स्थापित केल्यामुळे, नाते टिकवून ठेवण्याची गळ मनातल्या मनात का होईना पण घातली जात असेल का? समाजाने नातेसंबंधांसारख्या गोष्टींकडे अधिक नाजूकपणे पाहण्याची आवश्यकता असते.

नात्यामध्ये चूक कोणाची, हा खरे तर सार्वजनिक पातळीवर चघळण्याचा विषय असता कामा नये. पण जोवर आपल्याच घरात असे काही घडत नाही, तोवर असे विषय समाजासाठी विनाकारण चर्चेचे होतात. त्याचे विपरीत परिणाम आधीच विस्कटलेल्या नातेसंबंधामुळे विकल झालेल्या व्यक्तींच्या बरोबरीने, त्यांच्या कुटुंबावरही होत असतात. रोज भांडणे करून, मन:स्वास्थ्य बिघडवून जगण्यात फारसे हशील नाही, याचे भान वेळीच आले, तर विभक्त होऊन आनंदी राहण्याचा मार्ग सुकर होतो. बहुतेक वेळा दोषारोपांच्या फैरी झाडत कुणा एकावर दोषाचा ठपका ठेवण्याची स्पर्धा जिंकण्यातच अधिक रस असल्याचे दिसून येते.

मुद्दा दोन व्यक्तींच्या एकमेकांशी असलेल्या भावनिक व्यवहारांचा असायला हवा. साहचर्य टिकवायचे, तर एकमेकांबद्दल किमान आदर आणि प्रेम हा पाया असायला हवा. तो ढासळत गेला की संबंध बिघडण्यास सुरुवात होते. ‘लिव्ह इन’ नातेसंबंधात एकमेकांपासून दूर होण्याचे स्वातंत्र्य गृहीत असते. एकमेकांशी पटते आहे किंवा नाही, हे तपासून पाहण्याची ती संधी असते. परंतु अशा नात्यातून सुटका करून घेण्याचे मार्ग सामाजिक टीकेचे धनी होण्याच्या भीतीने अवलंबले जात नसतील ना, विवाहातील घटस्फोटापेक्षा ‘लिव्ह इन’मधून बाहेर पडणे अवघड तर होत नाही ना, आधीच व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारत वेगळय़ा वाटेने जाण्याचे धैर्य एकवटल्यानंतर, त्यातील अपयश चव्हाटय़ावर येण्यापेक्षा, आहे त्यातच इच्छेविरुद्ध राहण्याची अगतिकता तर भेडसावत नसेल ना, हे तपासायला हवे. केवळ ‘लिव्ह इन’मध्येच अशा घटना घडतात, असे नाही.

रीतसर विवाह केलेल्या जोडप्यांमध्येही अशा किंबहुना याहून अधिक वाईट घटना घडत आल्या आहेत, हे लक्षात घेतले पाहिजे. म्हणून दोष ‘लिव्ह इन’ पद्धतीत नसून एकमेकांना समजून घेण्यातील आहे, हे समजणे अधिक आवश्यक.