आंतरराष्ट्रीय

मेक्सिकोत ९५ जंगलांत वणवा

मेक्सिको सिटी – दुष्काळामुळे होरपळून निघालेल्या मेक्सिकोतील १५ राज्यांमधील ९५ जंगलांत वणवा भडकला आहे. या आगीमुळे ३५०० एकरपेक्षा जास्त जमिनीवरील जंगल नष्ट झालेले आहे. जवळपास अर्धा मेक्सिको आगीच्या विळख्यात अडकला आहे. या आगीचा फटका मोरेलोस, वेराक्रुझ या राज्यांना बसला आहे.

अग्निशमन दलाचे जवान पाण्याच्या टँकरसह घटनास्थळी दाखल झाले आहेत. मात्र, जोरदार वाऱ्यामुळे जंगलांतील आग आणखी पसरली आहे. अग्निशमन दलासह स्थानिक नागरिक झाडांच्या फांद्यांद्वारे आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मेक्सिकोत दुष्काळाचे भीषण संकट आधीपासून असताना जंगलांत आग लागत असल्यामुळे येथील नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. या आगीने शेतजमिनीही खाक झाल्या असून घरे भस्मसात झाली आहेत. मेक्सिको सिटीमधील जवळपास २१ दशलक्ष रहिवाशांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून मेक्सिकोतील जलपातळी विक्रमी नीचांकावर पोहोचली आहे.