अकोला : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र राज्याच्या दौ-यावर आहेत. लोकसभेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यासाठी अमित शाह महाराष्ट्र दौ-यावर आले आहेत. अमित शाह आज महाराष्ट्रातील काही महत्त्वाच्या शहरांमध्ये जाऊन त्या-त्या भागातील लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहेत. तसेच महाराष्ट्रातील भाजपच्या प्रमुख नेत्यांना महत्त्वाचे निर्देश देत आहेत. दरम्यान, राज्यातील विद्यमान १२ खासदार बदलले जाणार अशी शक्यता वर्तविली जात आहे.
अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली अकोल्यात अशीच एक बैठक पार पडली. अकोल्यातील जलसा हॉटेलमध्ये ही बैठक पार पडली. या बैठकीत जवळपास दीड तास लोकसभेची निवडणूक, मतदारसंघ आणि उमेदवार यांच्याबाबत खलबते झाली. त्यानंतर अमित शाह यांनी महत्त्वाचे निर्देश दिले. विशेष म्हणजे या बैठकीत कार्यकर्ते देखील होते. या कार्यकर्त्यांना अमित शाह यांनी महत्त्वाचा कानमंत्र दिला. या बैठकीला महाराष्ट्राचे भाजपचे महत्त्वाचे नेते उपस्थित होते. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा समावेश होता.
महाराष्ट्रातील भाजपचे किमान १२ विद्यमान खासदार चेहरे बदलले जाण्याची चर्चा सुरू झाली आहे. खासदार पक्षनेतृत्वाचा निर्णय धक्कादायक असू शकेल, हे लक्षात घेत यादीकडे अनेक जण डोळे लावून बसले आहेत. महाराष्ट्रातील विद्यमान अवघड परिस्थिती लक्षात घेत उमेदवारांची नावे बरीच उशिरा जाहीर होतील, असे समजते.